बोरगाव मंजू- जिल्हा विकास योजना नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत अकोला जिल्हा अंतर्गत जि.प. शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या ३० विद्यार्थ्यांसाठी ( १५ मुले + १५ मुली) इसरो (ISRO) बेंगलोर व दक्षिण भारतातील काही वैज्ञानिक स्थळांना विमानवारीने भेटी देण्यासाठी विज्ञानवेध शैक्षणिक सहलीला मान्यता मिळाली आहे. सदर सहलीसाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी दोन टप्यामध्ये चाळणी व निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यापैकी पहिली चाळणी परीक्षा दि. 17/11/2025 रोजी सर्व तालुकास्तरावर संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात आयोजित करण्यात आली असुन सदर परीक्षेला तालुकानिहाय खालील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.
१) अकोला तालुका – बी.आर.हायस्कुल अकोला – २५८ विद्यार्थी
२) अकोट तालुका – लालबहादुर शास्त्री ज्ञानपिठ अकोट – २७१ विद्यार्थी
३) बाळापुर तालुका- जि.प.माध्यमिक शाळा बाळापुर – ३०९ विद्यार्थी
४) बार्शिटाकळी तालुका – बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शिटाकळी- ५०२ विद्यार्थी
५) मुर्तिजापुर तालुका – मुर्तिजापुर हायस्कुल मुर्तिजापुर – २९७ विद्यार्थी
६) पातुर तालुका- वसंतराव नाईक विद्यालय पातुर- २१६ विद्यार्थी
७) सेठ बंसीधर विद्यालय तेल्हारा -२०१ विद्यार्थी
एकूण जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २०५४ विद्यार्थी चाळणी परीक्षेला प्रविष्ठ असुन प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे १५ मुले व १५ मुली यांची जिल्हास्तर निवड चाचणीसाठी निवड करण्यात येणार आहे. परीक्षा अतिशय गोपनिय पद्धतीने पार पाडली जावी म्हणून प्रत्येक केंद्रावर उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे एक सदस्यीय भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
प्रश्नप्रत्रिका गणित व विज्ञान या दोन विषयावर आधारीत असुन एकूण ५० प्रश्न व १.३० तास वेळ आहे.
जिल्हा स्तरावर सातही तालुक्यातुन निवड झालेल्या २१० विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा दि.27/11/2025 रोजी आयोजित करण्यात आली असुन सदर निवड चाचणी परीक्षेमधुन १५ मुले व १५ मुली यांची ISRO विमानवारी सहलीसाठी अंतीम निवड करण्यात येणार आहे. सदर उपक्रम हा ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक अनुभुती देणारा असुन जिल्हात पहिल्यांदा या सहलीचे आयोजन मा.जिल्हाधिकारी वर्षा मिना IAS व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनिता मेश्राम IAS यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) मा. रतनसिंग पवार नियंत्रक म्हणून सुक्ष्म नियोजन करीत असुन श्याम राऊत विस्तार अधिकारी (शिक्षण ) व अरविंद जाधव विस्तार अधिकारी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. सदर शैक्षणिक सहल ही माहे डिसेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवडयात प्रस्तावित असुन सदर उपक्रमाकडे जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण जिल्ह्यांतील शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा ,शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

