छत्तीसगड येथील हरवलेले बालक पालकांच्या स्वाधीन

अकोला दि.३० – छत्तीसगड येथून हरवलेला एक बारा वर्षे वयाचा बालक हा सोमवारी (दि.२९) अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. अकोला रेल्वे स्थानकावर हा बालक भटकतांना आढळून आला होता. चाईल्ड लाईनच्या टीमने या बालकाला शोधून बाल संरक्षण कक्षाच्या स्वाधीन केले. येथील शासकीय निरीक्षण गृह व बालगृह येथे या बालकाचा आतापर्यंत सांभाळ करण्यात आला.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, अकोला रेल्वेस्टेशन येथे (दि.१९ जुलै रोजी) रात्री १२ वर्षीय हा बालक भटकताना निदर्शनास आला. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकाला विचारपूस केली मात्र तो गोंधळलेल्या स्थितीत होता व बोलत नव्हता. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टिमने त्या बालकाला विश्वासात घेवून त्याच्या पालकांची शोध मोहिम सुरु केली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु
लाडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध मोहिम राबविण्यात आली. परिवाराचा शोध लागेपर्यंत या बालकाला शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, अकोला येथे दाखल करण्यात आले. हा बालक १२ वर्षाचा असून अतिशय शांत व कमी बोलणारा होता. तो स्वतःचे नाव व गावाचे नाव सांगण्यात असमर्थ दिसून येत होता. काहीही विचारल्यावर हा बालक ‘टोनीया’ हाच शब्दच पुन्हापुन्हा उच्चारीत असे. ‘टोनीया’ शब्द नक्की त्याचे नाव आहे की गावाचे नाव? हा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला.अखेर टोनीया शब्दाचा शोध गुगल वर केला. तेव्हा ते एका गावाचे नाव असल्याचे दिसून आले. हे गाव उत्तरप्रदेश व झारखंड राज्यामध्ये गुगल दर्शवत होते. परंतु बालकांच्या बोलीभाषा यावरुन तो झारखंड वा अन्य राज्यातील असावा, असा तर्क बांधण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास विभाग, बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या प्रयत्नाने बालकाच्या परिवाराचा शोध सुरु केला.

शासकीय बालगृहाचे समुपदेशक नंदन शेंडे यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून बालकाला विश्वासात घेत त्याच्याकडुन माहीती जाणून घेतली. बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे व पुन्हा गुगलवर केलेल्या शोधामध्ये टोनीया हे गाव छत्तीसगड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील असल्याचे खात्री झाली. त्यानुसार तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांचाशी संपर्क साधून संबधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाणेदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. त्या बालकांचे स्थानिक पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांशी भ्रमणध्वनीव्दारे बोलणे करून दिले असता स्थानीक भाषेत त्यांनी बालकांशी संभाषण करुन माहिती मिळविली. त्यानुसार पोलीस यंत्रणेची तपासाची चक्रे गतिमान झाली व त्या बालकाच्या परिवाराची माहीती मिळाली. स्थानिक पोलिसांनी त्या बालकाच्या पालकांशी संपर्क साधून बालकाची माहिती दिली. हा बालक एक महिन्यापासून त्याच्या परिवाराच्या संपर्कात नव्हता. बालकाची माहिती मिळताच त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण करुन या बालकाला सोमवार दि.२९ रोजी त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला आईवडीलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.


 Super Sales and Services तर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थी आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
Super Sales and Services सर्व प्रकारच्या Home Appliances दुरुस्ती करीता संपर्क L S Supekar
मो. नं 9922009050


जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक ‘पॉक्सो कायद्या’ची जनजागृती करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 

अकोला, दि.३०-  बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच जनसामान्य नागरिकांना व्हावा याकरीता जिल्हा व ग्रामस्तरावर प्रशिक्षण, कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.

जिल्हा बाल संरक्षण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू गुल्हाने, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, बाल कल्याण समिती सदस्य डॉ. विनय दांदळे, प्रांजली जयस्वाल, शिला तोष्णीवाल, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. वैशाली गावंडे, सारीका गिरवडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, पॉक्सो कायद्याविषयी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करा.बालगृहातील बालकांचे आधार नोंदणी करुन त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून द्या. तालुका संरक्षण अधिकारी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बालगृहातील पात्र १२ ते १८ वयोगटातील बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करण्यात आले आहे.  बालगृहातील बालकांची जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नियमित आरोग्य तपासणी, लैंगिक आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात येते. चाईल्‍ड लाईन व बाल संरक्षण कक्षाच्या मदतीने हरविलेल्या मुलांच्या शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी यावेळी सादर केली.


जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती; जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

अकोला, दि.३० –  समाजात रुजलेल्या काही अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी जादूटोना विरोधी कायदाचा जिल्हा व ग्रामस्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.टी. मुळे, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.


प्रसाद, भंडारा वितरण करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन

अकोला, दि.३०-  सार्वजनिक गणेश उत्सव बुधवार दि.३१ पासून साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्याअनुषंगाने सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार,प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार www.foscos.fssai.gov.in या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ, परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रितीने विल्हेवाट लावावी, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. अकोला जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.


राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

अकोला दि.३०-  राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दि.३१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

असे आहेत पुरस्कार

राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दोन लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२२ असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सहभागासाठी अट

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज इथे उपलब्ध

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

असे आहेत निकष

मूर्ती पर्यावरणपुरक असावी. सजावट पर्यावरणपुरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नयेत. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इ.बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारीक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा, पारंपारिक/देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

अशी आहे जिल्हास्तरीय समिती

वर नमूद केलेल्या बाबींची जे गणेशमंडळ पूर्तता करतील, त्यांना गुणांकन देऊन विजेत्यांची निवड करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची रचना पुढील प्रमाणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, संबंधीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य राहतील. सदर समिती गणेश मंडळ स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती माहिती, व्हिडिओ, कागदपत्र मंडळाकडून प्राप्त करून घेतील व दि.१३ सप्टेंबर पर्यंत मंडळांना दिलेले गुणांकन राज्य समितीला सादर करतील.

राज्यस्तर समितीची रचना करण्यात आली असून यात सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील वरिष्ठ गट अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे ३६ शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या आधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील,असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news