विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्ण पोषण आहाराकरिता 1 वर्षासाठी दत्तक.
अकोला दि. 31 ऑगस्ट 2022 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे उदिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवत आहे. अकोला महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत क्षयरोग दुरीकरणाचे काम सुरु आहे.

सदर उदिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने सामाजातिल विविध स्तरावर काम करणा-या संस्था आणि व्यक्ती सोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. केंद्रिय क्षयरोग विभाग, (MOHFW) ने “Community Support To TB Patient” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रमाची उद्दिष्टे, टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरीक्त मदत प्रदान करणे, 2025 पर्यत क्षयरोग मुक्त भारत उदिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सहभाग वाढवणे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, या प्रमाणे आहे. या कार्यक्रमाव्दारे, क्षयरोग दुरीकरणाच्या प्रयत्नामध्ये व्यक्ती/ सामाजिक संस्थाचा सहभाग वाढवणे, क्षयरोगाशी संबंधित समाजातील भीती जनजागृती व्दारे कमी करणे, उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवठा करणे असे परिणाम अपेक्षित आहेत.
त्या अनुषंगाने आज दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश स्थापनेच्या शुभमुहुर्तावर या उपक्रमामध्ये निक्षय मित्र म्हणून विप्र युवा वाहिनी गणेश मंडळ, अकोला यांनी पुढाकार घेउन अकोला महानगरपालिकेच्या क्षयरोग कार्यालय अंतर्गत उपचार घेत असलेले शहरी भागातील 5 आणि ग्रामीण भागातील 5 असे एकुण 10 टीबी रुग्णांना मंडळाच्या पदाधिकारी यांनी पुढील एक वर्षासाठी पोषण आहार करिता दत्तक घेतले आहे. यावेळी मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे शहर क्षयरोग अधिकारी तथा मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनीष शर्मा यांनी मंडळावर भेट देउन सत्कार केला आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुमित शर्मा, अॅड.सौरभ शर्मा, अॅड.गिरीराज जोशी, विदुर शर्मा, गोपाल शर्मा, अखिल व्यास, मनपा क्षयरोग कार्यालयाचे उमेश पदमने, वसंत उन्हाळे आदिंची उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी शहर क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अथवा dtomhakc@rntcp.org या ईमेल आयडीवर किवा कार्यालय पत्ता – शहर क्षयरोग कार्यालय, नारायणीदेवी शर्मा कन्या पाठशाळा या ठिकाणी भेट देउन निक्षय मित्र होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मनपा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.
गणेशोत्सव – 2022, मनपा एक खिडकीतून आजपर्यंत एकुण 297 परवानग्या देण्यात आल्या.
अकोला दि. 31 ऑगस्ट 2022 – अकोला शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यासाठी लागणा-या विविध विभागाचे परवानगी देण्याकरिता शहरातील गणेश मंडळांना अधिक सोईचे व्हावे तसेच या कामात सुसुत्रता येण्याचे अनुषंगाने गणपती उत्सव – 2022 करिता मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे दि. 22 पासून ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत शासनाच्या निर्देशानुसार सर्व परवानग्या एकाच छता खाली मिळविण्यासाठी एक खिडकी योजना प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली होती.
याव्दारे आज दि. 31 ऑगस्ट 2022 शेवटच्या दिवशी पर्यंत एकुण 297 गणपती मंडळांना परवानग्या देण्यात आली आहे. यावेळी अकोला महानगरपालिका नगर रचना विभागाचे सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, तुषार जाने, रितेश टेकाडे, प्रतीक कटियारमल, अग्निशमन विभागाचे शुभम वाघ, शुभम बोराडे, शहर वाहतुक शाखेचे दिलीप उमाळे, जुने शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सुषमा रंगारी, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी आरती क्षीरसागर तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचा-याची उपस्थिती होती. तसेच अकोला शहरातील सर्व गणेश भक्तांनी कोरोना प्रतिबंधामक उपाययोजनांचे पालन करून हा सण उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.