मनपा अतिक्रमण विभागाव्दारे पुर्व आणि दक्षिणझोन अंतर्गत अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई.
अकोला दि. 7 जुलै 2023 – अकोला महानगरपालिका पुर्व झोन अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आज दि. 7 जुलै रोजी सुधीर कॉलोनी येथील स्वामी विवेकानंद शाळा हिवरा आश्रम यांच्या व्दारे रस्त्यावर अतिक्रमण करून स्वच्छतागृहाचे करण्यात आलेल्या अतिक्रमीत बांधकामावर मनपा अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. याचसोबत दक्षिण झोन अंतर्गत एस.टी.वर्क शॉप समोरील गायत्री नगर स्थित मुख्य नाल्यावर असलेले धाप्यांचे अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.



या कारवाईत दक्षिण झोनचे सहा.आयुक्त देविदस निकाळजे, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा. अतिक्रमण अधिकारी चद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, कनिष्ठ अभियंता तुषार जाने, प्रतीक कट्यारमल, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे, मनपा अतिक्रमण विभागातील आणि अभिकर्ताचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा;
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 12 रोजी 216 पदांसाठी भरती प्रक्रिया
अकोला,दि.7 – पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवार दि. 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 216 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी उद्योजक याप्रमाणे-
- क्रेडिट अॅक्सेस ग्रामिण लि. अकोला. 2. अॅबेल इलेक्ट्रो सॉफ्ट टेक्नोलॉजी प्रा.लि. अकोला 3. सनसाईन इंजिनिअरिंग अकोला. 4. नवकिसान बायोप्लान्टीक लि. नागपूर 5. टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा. लि. पुणे. 6. पिपल ट्री वेंन्चर प्रा.लि. पुणे येथेएकूण 216 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. हा रोजगार मेळावा बुधवार दि. 12 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
सहकार विभागातील विविध पदांसाठी परिक्षा;ऑनलाईन अर्ज मागविले
अकोला दि.7 :- सहकार आयुक्त व निबंधक, सहकार संस्था पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक तसेच सर्व विभागीय सहकारी संस्थेच्या कार्यालयांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी सरळसेवेने स्पर्धा परिक्षा जाहिर झाली आहे. यामध्ये गट क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-1, सहकार अधिकारी श्रेणी-2, लेखापरिक्षक श्रेणी-2,सहायक सहकारी अधिकारी/वरीष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर तपशील सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 21 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन सहकार संस्था पुणे सहकार आयुक्त व निबंधक यांनी केले आहे.
०००००
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारांसाठी 14 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रित
अकोला दि.7 :- केंद्र शासनाव्दारे तेनझिंग नॉर्ग राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2022 च्या नामांकनासाठी शुक्रवार दि. 14 जुलैपर्यंत ऑनलाईनव्दारे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपला प्रस्ताव ऑनलाईन सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.
अटीशर्ती याप्रमाणे : नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंनी मागील तीन वर्षामधील 2020 ते 2022 या कालावधीतील सर्व कामगिरीबाबत माहिती देणे आवश्यक. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे. खेडाळूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी. तेनझिंग नॉर्ग राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनाच्या https://award.gov.in ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येईल. उशिरा प्राप्त प्रस्तावांचा विचार केल्या जाणार नाही. ऑनलाईन पोर्टलव्दारे सादर केलेले प्रस्तावाची एक कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर akoladso@gmail.com तसेच एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
000000