पुरात अडकलेल्या  शेतक-याला सुखरुप वाचविले शोध व बचाव पथकाची कामगिरी

पुरात अडकलेल्या  शेतक-याला सुखरुप वाचविले शोध व बचाव पथकाची कामगिरी

      अकोला, दि. 19 : मुर्तिजापुर तालुक्यातील खरप ढोरे येथे पुरामुळे शेतात अडकलेल्या एका शेतकरी बांधवाला जिल्हा शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणले.

        मुर्तिजापुर तालुक्यातील खरप ढोरे आणी चिखली  या गावांत अतिवृष्टीमुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर नाल्याला पूर आला. तेथील स्थितीची माहिती मिळताच मुर्तिजापुर येथील उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे हे जिल्हा शोध व बचाव पथक व पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकासह दाखल झाले आणि तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.

खरप ढोरे येथील बाजीराव उईके (वय 45) हे शेतकरी बांधव गावापासून एक कि. मी. अंतरावरील शेतात अडकले होते. शोध व बचाव पथकाने तेथे तत्काळ पोहोचून बोटीद्वारे त्यांना सुखरुप बाहेर काढले.

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, मयुर सळेदार,अंकुश सदाफळे, ज्ञानेश्वर म्हसाये, शरद महल्ले,मयुर कळसकार, ऋतिक सदाफळे यांचा पथकात समावेश होता. जिल्हा व तालुका स्तरावर बोटी व इतर साहित्यासह पथके सुसज्ज आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. साबळे यांनी दिली.

——————————————————————————————

जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टी

अकोला, दि. 19 : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 49.01 मिमी पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक पाऊस व त्यासह अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. तेल्हारा तालुक्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 103 मिमी आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मंडळनिहाय पाऊस खालीलप्रमाणे : तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा मंडळ 116 मिमी, माळेगाव 107 मिमी, अडगाव 88.3 मिमी, पंचगव्हाण 116 मिमी, अकोला तालुक्यातील शिवणी मंडळ 65.3 मिमी, कौलखेड 71.8 मिमी, मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूर मंडळ 93 मिमी, हादगाव 88 मिमी.

मूर्तिजापूर तालुक्यातील खरप ढोरे, चिखली, मूर्तिजापूर शहर, हादगाव आदी गावांतील 210 घरांचे अंशत: व 45 घरांचे पूर्णत: नुकसान झाले.

शेतीपिके व फळपीके बाधित क्षेत्र

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित क्षेत्राचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान पुढीलप्रमाणे : मूर्तिजापूर तालुक्यात 8 हजार 290 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले व 292 हे. शेतजमीन खरडून नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यात 2 हजार 60 क्षेत्रावरील पिकांचे नुकसान व 130 हे. जमीन खरडून निघाली. अकोला तालुक्यात 3 हजार 942 हे. क्षेत्रावरील पीकांचे नुकसान होऊन 93 हे. जमीन पूर्णत: खरडली. यानुसार या तीन तालुक्यांतील एकूण 14 हजार 292 हे. क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले व 515 हे. शेतजमीन खरडून हानी झाली.

बचावकार्य

मूर्तिजापूर तालुक्यात खरब ढोरे या गावात नाल्याला पूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिक शोध व बचाव पथकाने मदतकार्य करून शेतात अडकलेल्या बाजीराव उईके (वय 45) यांना सुखरूप सुरक्षितस्थळी आणले. मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, मंडळ अधिकारी, तलाठी व मूर्तिजापूर पोलीस पथक उपस्थित होते.

सतर्कतेचा इशारा

पावसाचे प्रमाण व पूरजन्य परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीनाल्यांना पूर आल्यास त्याठिकाणी जाऊ नये. पुलावरून पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडू नये. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीनाल्यानजिक जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तहसील कार्यालय, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, महापालिका, अग्निशमन दल, जिल्हा नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक (0724) 2424444 असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news