सारस बियाणे कंपनीकडून अनेक कास्तकारांची फसवणूक
कास्तकार अनंत देशमुख यांची अकोला कृषी अधिकार्यांकडे तक्रार
अकोला : सारस या बियाणे कंपनीचे सोयाबीन बिज पेरणीनंतर उगवलेच नसल्याने हजारो शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कास्तकाराने त्या कंपनीकडे तक्रार केली. परंतू कंपनी व्यवस्थापकांनी कोणताही दिलासा न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे याप्रकरणाची तक्रार सांगळुद येथील कास्तकार अनंत दिगांबर देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी, अकोला यांचेकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृतांत असा की, सांगळूद येथील तक्रारकर्त्या कास्तकारांनी दि.१३ जुलै रोजी जे एस ३३५ च्या ११ बॅगा सारस कंपनीचे सोयाबिन संजय झामरे यांच्या संजय कृषी सेवा केंद्रातून विकत घेतले. याच कंपनीचे हेच बियाणे अनेक कास्तकारांनी सुध्दा विकत घेऊन पेरणी केली.परंतु त्या वाणात उगवण शक्तीच नसल्याने त्यांच्यासह असंख्य कास्तकारांची पेरणी वाया गेली. यामुळे सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन दुबार पेरण्या कराव्या लागल्या. याबाबत अनंत दिगांबर देशमुख यांनी सर्व कास्तकारांच्या वतीने सारस कंपनीचे व्यवस्थापक श्री. मनिष ताथोड यांचेकडे फोनद्वारे प्रथम तक्रार केली. त्यांनी याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा न केल्याने शेवटी कंपनी मालक श्री. विनोद राठोड यांना फोन केला. परंतु त्यांनीही याबाबतची तक्रार मंजूर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी शेवटी अकोला तालुका कृषी अधिकार्यांकडे तक्रार करून दाद मागीतली आहे. शेतकर्यांना बोगस बियाणे पुरवून त्यांना आर्थिक संकटात टाकणार्या कंपनीविरूद्ध कारवाई करून शेतकर्यांच्या बियाण्यांची किंमत आणि या फसवणुकीमुळे होणार्या संभाव्य नुकसानाची भरपाई कंपनीकडून देण्यात यावी, अशी फसवणुक झालेल्या सर्व कास्तकारांची मागणी आहे.
Thanks for reporting the facts.