नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता!
नागपूर ते पुणे, हैदराबाद आणि भोपाळला वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी माहिती दिली की, रेल्वे अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अभ्यास अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही दिशांना विविध प्रदेशात गाड्या जातात. नागपूरच्या बहुतांश गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. मात्र, सर्वाधिक गर्दी असलेल्या गाड्या मुंबई, पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी आहेत. नागपूर ते मुंबई जाण्यासाठी अनेक गाड्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागपूरहून पुणे, हैदराबाद, भोपाळकडे मोठ्या प्रमाणात खासगी बसेस धावतात.
वंदे भारतला देशभरातील विविध मार्गांवर आणि विशेषतः महाराष्ट्रासह मध्य रेल्वे विभागावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय विविध मार्गांवर वंदे भारत गाड्या चालवण्याची तयारीही करत आहे. त्यामुळे नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे वंदे भारत गाड्या लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
वंदे भारत ट्रेन नागपूरहून पुणे हैदराबाद आणि भोपाळला सुरू झाल्यास इतर गाड्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि आरक्षणामुळे रेल्वे प्रशासनावरील मोठा भार कमी होईल. सध्या वंदे भारत ट्रेन नागपूर-बिलासपूर मार्गावर धावते. मध्य रेल्वेच्या सर्व वंदे भारतांच्या तुलनेत या आलिशान ट्रेनला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद आहे.
रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे म्हणाले की, “वंदे भारत ट्रेनचा विषय पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित आहे, वंदे भारत ट्रेन कोठून आणि केव्हा सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल”.