मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण यांना मिळाला अटकपूर्व जामीन!
अकोला शहरात गेल्या १३ मे रोजी थोर महापुरुषाबद्दल • आक्षेपार्ह लिखाण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने रामदासपेठ पोलिस स्टेशन येथे जमाव जमविल्याचा आरोप साजीदखान पठाण यांच्यासह इतरांवर होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
१३ मे रोजी रात्री १०.२० मिनिटांनी पोलिस स्टेशन • रामदासपेठ गेटच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती आणि त्या गर्दीमध्ये लोक नारेबाजी करीत होते. गर्दीमधील लोकांचे म्हणणे होते, त्यांच्या इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर आला आहे आणि मजकूर देणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी त्या जमावाला आदेश दिला की, तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये बेकायदेशीर कृत्य करू नका व पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहे. परंतु, जमावामध्ये काही लोकांनी चिथावणी दिली. त्यामुळे जुने शहरामध्ये दंगल घडली. या जमावामध्ये मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण यांच्यावर आरोप होता. तेसुध्दा तेथे हजर होते. मात्र, वास्तविक साजीदखान पठाण यांनी जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला व रामदासपेठ पोलिसांना गुन्हा नोंदविण्यासाठी विनंती केली. दंगल घडल्याने पोलिसांनी जमावाविरुध्द रिपोर्ट दिला होता आणि त्यावर कलम १५३ (ए), ५०५ (२) आणि १४३, १४५, १८८ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यांमध्ये साजीदखान पठाण यांच्यासह तिघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाने यांच्या न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणामध्ये साजीदखान पठाण यांच्यासह तिघांतर्फे अॅड डओदिलदार खान, अॅड. राजेश जाधव, अॅड. श्याम जोशी, अॅड. सैन अनवर व अॅड. इरशाद खान यांनी काम पाहिले.