वृक्षांच्या लागवडीत घोळ : देयक लाटण्याचा प्रयत्न
सस्ती चतारी येथील प्रताप, विभागीय आयुक्ताकडे तक्रार
एकीकडे रोजगार हमी योजने अंतर्गत शासन वृक्ष लागवडीवर कोट्यावधी रुपये खर्च करून शहर व ग्रामीण भागात मोहीम राबवित आहे. दुसरीकडे पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्ष लागवडीत घोळ करून हजारो वृक्षाची लागवड कागदावर दाखवून देयक लाटण्याचा प्रयत्न होत आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत यंदा सस्ती, चतारी परिसरात बोटावर मोजणे इतक्या वृक्षांची लागवड करून हजारो वृक्षांची लागवड कागदावर दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतची तक्रार सस्ती येथील सामाजिक कार्यकर्ता दिलीप डीगांबर परनाटे, व खेट्री येथील फयाज बेग यांनी १७ ऑगस्ट रोजी थेट अमरावतीच्या विभागीय आयुक्ताकडे धाव घेऊन तक्रार केली आहे. शासनाच्या डोळ्यात माती टाकून वृक्षाच्या लागवडीचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्ष लागवडीच्या मोहिमेवर शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून शासनाची होणारी लूट थांबविण्याची गरज आहे.
हजारो वृक्षांची लागवड केल्याचा कागदोपत्री बनाव
वृक्ष लागवड केल्यावर संबंधितांकडून पाहणी करून त्याचे देयक काढण्यासाठी हिरवी झेंडी द्यावी लागते, परंतु संबंधितांकडून सुद्धा कागदावर भेटी दाखवून हजारो वृक्षांची लागवड केल्याचा बनाव केल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
वृक्ष लागवड बाबत तक्रार प्राप्त झाली नाही, तक्रार प्राप्त झाल्यावर मोका पाहणी करून चौकशी करण्यात येईल, चौकशी केल्याशिवाय देयक काढण्यात येणार नाही
अनंता लव्हाळे विस्तार अधिकारी प. स.पातूरप्रतिक्रिया
चतारी परिसरात वृक्ष लागवड केल्या बाबतची माहिती नाही, वृक्ष लागवडी बाबतचा ग्रामपंचायत कडून ठराव सुद्धा देण्यात आला नाही, तसेच ग्रामपंचायत मार्फत एक ही वृक्षाची लागवड करण्यात आली नाही, तरीही चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार देण्यात येईल
नविता विनोद सदार सरपंच चतारी
वृक्ष लागवड मोहिमेचा बट्ट्याबोळ
शासन जुलै महिन्यामध्ये देशभरात कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीची मोहीम रवितात, परंतु पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्ष लागवड मोहिमेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र आहे.