कृषी विद्यापीठात विद्यापीठ शहीद दिन व सद्भावना दिन साजरा !
शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता प्रचंड मोठे आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली.
विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन २० ऑगस्ट रोजी करण्यात येते. आज संपन्न झालेल्या या श्रद्धांजली सभेसाठी भर पावसातही विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाचे वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांची उपस्थिती होती. अतिशय भावपूर्ण अशा या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी तथा कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाति तायडे, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. शैलेश हरणे, यांचे सह सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विद्यापीठ अभियंता, विद्यापीठ ग्रंथपाल, विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीलाच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी समस्त विद्यापीठ प्रशासनाचे वतीने शहीद स्मारकाला वंदन करीत शहिदांना पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस विभागाचे वतीने बिगुल वाजवून व सामूहिक मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. वरूण राजाचे दमदार उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्राच्या सभागृहात पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत सर्व उपस्थितानी दोन मिनिटे मौन पाळत विद्यापीठ शाहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्याचप्रमाणे आज भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे जयंती दिनानिमित्त सद्भावना दिन सद्भावना शपथ घेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी उपस्थित सर्वांनाच सद्भावना शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सचिन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांचे मार्गदर्शनात श्रीमती. मंजुषा देशमुख, श्री. विलास इरतकर , श्री. रोहित तांबे, श्री संजय बोबडे, कमलेश कदम, सौ पल्लवी आडे व इतर सहकारी यांनी परिश्रम घेतले त्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ सुरक्षा विभाग यांचे सह सामान्य प्रशासन विभाग, पुष्पशास्त्र व प्रांगणविद्या विभाग आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करीत शहिदांना वंदन केले.
याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात माननीय कुलगुरू तथा सर्व संचालक अधिष्ठाता सहयोगी अधिष्ठाता यांनी वृक्षारोपण केले. परिषद कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी.या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.