जनतेच्या पैशाला पाण्यात घालवणाऱ्या शासनाच्या विरोधात वंचितचे जनआक्रोश आंदोलन
जनतेच्या पैशातुन अकोला महापालिकेत तात्कालीन भाजपा सरकारने अकोला शहरात बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडीने जन आक्रोश आंदोलन केले. जनतेच्या पैशातुन अकोला महापालिकेत तात्कालीन भाजपा सरकारने अकोला शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर, टावर चौक ते निशांत टावर गांधी रोड पर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतु हा भुयारी मार्ग शहरातील लोकांना डोकेदुखी ठरला आहे. एक तर या भुयारी मार्गाने वरील रस्ते लहान झाले असून या लहान रस्त्यावर सतत लहानमोठे अपघात होत राहतात. त्यातच या भुयारी मार्गात मागील दोन महिन्यापासून पाणी साचलेले आहे. त्यामुळे या भुयारी मार्गासाठी लावण्यात आलेला जनतेचा पैसा हा शासनाने पाण्यात घातला असल्याने या मार्गामधील साचलेले पाणी बाहेर काढून हा मार्ग जनतेच्या रहदारीसाठी सुरू करावा अन्यथा हा भुयारी मार्ग जलतरण तलाव म्हणून घोषित करावा व तो जनतेसाठी खुला करावा अश्या घोषणा देत वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या जन आक्रोश आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, जि. प. शिक्षण सभापती मायाताई नाईक, महिला व बालकल्याण समिती सभापती मायाताई नाईक, जेष्ठ नेते अशोक शिरसाट, पं. स. उपसभापती अजय शेगावकर, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.