मराठा समाजाकडून जालन्यातील एका गावात उपोषण सुरु होतं. या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात संबंधित घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे लाठीचार्ज पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि गावकऱ्यांसोबत पोलिसांची बातचितदेखील झाली होती. आंदोलनस्थळी पाच हजारांचा जमाव जमलेला होता. यावेळी पोलीस आणि गावकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याचा दावा आंदोलकांचा आहे.