जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

 जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

अकोला, दि. 6 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 6 ते 10 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे.

          पावसाळ्यात नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थिती पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडू नये. नदी-नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

      टपाल विभागातर्फे 18 सप्टेंबरला पेंशन अदालत

अकोला, दि. 6 : टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी पेंशन अदालत प्रवर अधिक्षक टपाल कार्यालयात  दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता  होईल.

निवृत्तवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित, तसेच सेवेत मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या लाभाबाबत तक्रारींचे निवारण या अदालतीत होईल. यापूर्वी तक्रार देऊनही तीन महिन्यात निराकरण न झालेल्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील निवृत्तीधारकांच्या तक्रारींचा अदालतीत विचार होईल. संबंधितांनी 12 सप्टेंबरपर्यंत प्रवर अधिक्षक टपाल कार्यालयात तक्रार पोस्टाने किंवा समक्ष दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोल्यात 13 सप्टेंबरला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला, दि. 6 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

       अकोला येथील भारतीय जीवन विमा निगम, छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, पुणे येथील फिनोलेक्स, इण्डुरन्स टेक्नॉलॉजी व ए. के. इंजिनिअरिंग आदी कंपन्यांमधील एकूण 254 पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, पदविका, पदवीधर आदी अर्हता असलेल्या युवक व युवतींना विविध पदांसाठी अर्ज करता येईल.

इच्छूकांनी दि. 13 सप्टेंबर रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा, पासपोर्ट आकारातील छायाचित्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी तत्काळ पूर्ण करावी

                     जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन

      अकोला, दि. 6 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत  14 व्या हप्त्याचे वितरण नुकतेच झाले आहे.  तथापि, अजूनही 22 हजारहून अधिक लाभार्थ्यांचे ई- केवायसी पूर्ण नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही. तरी संबंधित लाभार्थ्यांनी ई- केवायसी व बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पीएम किसानयोजनेत पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे  व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी बंधनकारक आहेत. ते पूर्ण न करणारे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.  कृषी विभागामार्फत नुकतीच याबाबत मोहिमही राबविण्यात आली. तथापि, अद्यापही अकोला जिल्ह्यात 22 हजार 140  लाभार्थ्यांची ई केवायसी  व  12 हजार 741 लाभार्थ्यांचे  बँक खाते आधार संलग्न करणे  प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. विभागाकडून वारंवार सर्वंकष प्रयत्न करून देखील ई-केवायसी व  बँक खाते आधार संलग्नीकरणासाठी प्रतिसाद न देणा-या लाभार्थ्यांना पोर्टलवरून वगळण्याच्या सूचना प्राप्त आहेत.

               त्यामुळे पीएम किसान योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण दि. 10 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिसाद न दिल्यास लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news