अकोल्यात ८१ वर्षाची परंपरा असलेला बैलपोळा उत्सव आनंदात संपन्न.
बैल पोळा उत्सव मोठ्या आनंदात जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. अकोल्यात पोळा उत्सवाची अनोखी परंपरा आहे. शहरात महाराष्ट्रातील एकमेव पोळा चौक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या चौकात पोळा भरतो. त्यावरून या चौकाला पोळा चौक नाव पडले आहे. ८१ वर्षांपासून येथे सर्जा – राजाच्या उत्सवाची मोठी परंपरा आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून बैलपोळ्यात सहभागी केले.
अकोल्यातील जुने शहर परिसरात पोळा चौक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा बैलपोळा संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थातर्फे दरवर्षी घेण्यात येतो. या निमित्ताने शेतकरी सन्मान तसेच उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धा घेण्यात येते. उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलांना पारितोषिक देऊन त्याच्या गौरव करण्यात येतो. अकोल्यात लोकवस्ती जुने शहरात सर्वप्रथम वसली, जवळच अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिर आणि किल्ला आहे. त्यामुळे पूर्वीपासून या भागात सधन कास्तकार राहत होते. संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी लाकूडफाटा आणून येथे विकायचे. दिवसभर परिसरात शेतकऱ्यांची वर्दळ राहायची. बैलजोड्यांचा वावर असायचा. याच कारणामुळे ८१ वर्षापूर्वी स्थानिक लोकांनी येथील चौकात पोळा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कालांतराने या चौकाचे नाव पोळा चौक पडले. येथील बैलपोळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. उत्सव सुरू झाल्याच्या काही वर्षांनंतर शेतकऱ्यांनी चौकात बैलजोडीचे भव्य स्मारक उभारण्याचे ठरवले. आणि सन १९७७ ला बैलजोडीची चौकात स्थापना केली. ही बैलजोडी अजूनही सुस्थितीत असून आजही येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष बैलजोडीकडे वेधले जाते. दरवर्षी चौकात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.