किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरण; सर्वोच्च न्यायालयातुन गावंडे बंधूंना जामीन मंजूर !
अकोला :- गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांडातील दोन संशयित आरोपींना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. धीरज प्रल्हाद गावंडे व सुरज प्रल्हाद गावंडे अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
सन 2019 मध्ये गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय परिसरात दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी फिर्यादी प्रवीण हुंडीवाले यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी तब्बल तेरा संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सदर दोन्ही संशयित धीरज प्रल्हाद गावंडे आणि सूरज प्रल्हाद गावंडे हे जिल्हा कारागृहात होते. सदर प्रकरण हे अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असून याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षाची बाजू मांडत आहे.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गावंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी गावंडे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील वरिष्ठ अधिवक्ता नितेश गुप्ता, अधिवक्ता मनोज गोरकेला यांनी तर फिर्यादी पक्षाच्या वतीने सरकारी वकील व अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कामकाज बघितले .