डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’चा शुभारंभ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’चा शुभारंभ
शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन व मार्गदर्शन करावे
  – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

अकोला, दि. २९ : शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्पादनखर्चात घट, उत्पादनात वाढ व शेतमालाला भाव मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेचा वेध घेऊन पीक पद्धतीत बदल, शेतीत विकसित वाणाचा अवलंब व्हावा. यादृष्टीने संशोधन व सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आजपासून १ ऑक्टोबरपर्यंत तीनदिवसीय शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिकांचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मंत्री श्री.  गडकरी यांनी शिवार पाहणी व विविध पीक प्रात्यक्षिकांचे अवलोकन करून तज्ज्ञांकडून विविध पिकांवरील संशोधनाची माहिती घेतली.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे व शेतमालाला योग्य भाव आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाची भूमिका महत्वाची आहे. शेतकऱ्यांना जागतिक बाजारभावांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी विद्यापीठाने संकेतस्थळ विकसित करावे. त्यानुरूप कोणते पीक घेतल्यास जास्त उत्पन्न मिळू शकेल याचे मार्गदर्शन करावे. दुग्धोत्पादनात वाढ, जलसंवर्धनासाठीही विद्यापीठाने भरीव प्रयत्न करावेत.
विदर्भातून बांगलादेशात निर्यात होणाऱ्या कापसावरील वाहतूक व निर्यात खर्च कमी होण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात ‘ड्राय पोर्ट’ निर्माण होत आहे. इंधनात इथेनॉलचा पर्याय निर्माण झाल्याने त्याचाही शेती क्षेत्राला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीतही तग धरू शकतील व कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पादन देऊ शकतील अशा पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी योगदान द्यावे. त्यासाठी संशोधन व प्रयोग चारही कृषी विद्यापीठात प्रत्येकी १०० एकर क्षेत्रावर करावेत असे आदेश दिले आहेत. विद्यापीठाने एक गाव आदर्श गाव निर्माण करण्याचे ठरवले आहे. एकही शेतकरी आत्महत्या होऊ नये अशी आदर्श गावे निर्माण व्हावीत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात हरितक्रांतीचे प्रणेते कृषी तज्ज्ञ   एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.
थेट पीक प्रात्यक्षिके हे शिवारफेरीचे वैशिष्ट्य असून एकूण 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर विविध पीकांची एकूण २२५ थेट प्रात्यक्षिके पहावयास मिळत आहेत. विविध संशोधन विभागांचे १ हजार १०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहता येतात.. त्याचप्रमाणे, १ हजार ५२९ हे क्षेत्रावर खरिप हंगामातील विविध पिकांचे बीजोत्पादन कार्यक्रम पाहता येतात. रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news