_स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात अनेक मान्यवरांचे श्रमदान_
जिल्ह्यात लोकचळवळीतून निरंतर स्वच्छता निर्माण व्हावी -जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तस्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ मोहिम जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे राबविण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध मान्यवरांनी सहभागी होत श्रमदान केले.
स्वच्छ्ता हीच सेवा या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात कलेक्टर ऑफिस व मेडिकल कॉलेज परिसरात श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी हाती झाडू घेऊन श्रमदान केले. उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, महापालिकेच्या उपायुक्त गीता वंजारी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. दिनेश नेताम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात श्रमदानातून स्वच्छता निर्माण करून केला होता. ‘एक तारीख एक तास’ उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. निरंतर स्वच्छतेसाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. स्वच्छ्ता ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.
स्वच्छता निरीक्षक उमेश रामटेके, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सरिता राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होते.