शिवार फेरीचा दुसरा दिवस फुललेले शिवार अन् ओसंडणारा उत्साह…..
शिवार फेरीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 8 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू -भगिनी, विद्यार्थी -विद्यार्थिनी ची लक्षवेधी उपस्थिती!
अकोला, वर्धा, वाशिम जिल्हाधिकारी यांचा शिवार फेरीत सहभाग ठरला लक्षवेधी!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी वर्धा, यवतमाळ, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाचा परिसर फुलून गेला होता आणि शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक प्रकल्प, भरडधान्ये प्रक्रिया केंद्र, काढणी पश्चात शेतमाल प्रक्रिया केंद्र, कापूस संशोधन केंद्र, अखिल भारतीय समन्वित संत्रा वर्गीय फळे संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, नागार्जुन वनौषधी विभाग आणि यंदा सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या 20 एकरावर साकारलेल्या थेट पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र आदी ठिकाणी शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनीची अफाट गर्दी बघावयास मिळाली.
थेट पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र
तब्बल 20 एकर प्रक्षेत्रावर साकारलेल्या विविध पिकांच्या 220 हून अधिक जाती अत्याधुनिक लागवड तंत्रज्ञान, शेतकरी बंधूंनी याची देही याची डोळा बघत व्यावसायिक पद्धतीने अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वसा आपल्यासोबत घेऊन गेले. या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध पीक वाणांसह राज्यातील इतरही कृषी विद्यापीठे आणि खाजगी संस्थांच्या सहभागातून शेतकरी बांधवांना एकाच पिकाचे अनेक जाती बघता आल्या त्यांचे लागवड तंत्रज्ञान शिकता आले आणि त्यातून जे चांगले ते आत्मसात करण्याची अद्वितीय संधी या निमित्ताने प्राप्त झाली होती. विद्यापीठाच्या या उपक्रमाला शेतकरी बंधूंनी भरभरून प्रतिसाद दिला व तुलनात्मक पद्धतीने विविध पीक व एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
अकोला, वर्धा, वाशिम जिल्हाधिकारी यांचा शिवार फेरीत सहभाग ठरला लक्षवेधी!
दरम्यान आजच्या शिवार फेरीला अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी स्वतः भेट देत प्रत्येक प्रक्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले व आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी योजनांच्या माध्यमातून विकासात्मक बाबी कशा अवलंबिल्या जातील याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे आणि इतर शास्त्रज्ञा सोबत चर्चा देखील केली.
ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक*
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून मानवरहित फवारणी तंत्र विकसित करण्यात आले आहे. यामुळे पिकांवर अचूकपणे फवारणी करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांमुळे होणाऱ्या संभाव्य विषबाधांना आळा बसणार आहे. विद्यापीठातर्फे काही खाजगी कंपन्यांच्या सहकार्यातून ड्रोन फवारणी तंत्राचे प्रात्यक्षिक मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर आयोजित केले होते. या तंत्राचा वापर करून केवळ आठ ते दहा मिनिटांमध्ये आठ लिटर पाण्यात एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे शक्य आहे. त्यामुळे ड्रोन फवारणी तंत्राविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल जागृत झाल्याचे दिसून आले.
‘अंबा’ व ‘सुवर्णसोया ‘ वाण ठरले विशेष आकर्षणाचे केंद्र
विद्यापीठाच्या अंबा व सुवर्णसोया या नवीन सोयाबीन वानांची शेतकऱ्यांमध्ये विशेष रुची दिसून आली. विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रावर या दोन्ही वानांविषयक पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकरिता उपलब्ध आहे. या वाणांचे बियाणे काही निवडक शेतकऱ्यांना लागवडी करता या अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे. अति पावसाच्या परिस्थितीतही अंबा या वानाने एकरी 15 क्विंटल चा उतारा दिल्याचे काही शेतकऱ्यांनी नमूद केले.
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्याकरता
१. पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करणे,
२. शेतीला लागणारा खर्च निम्म्यावर आणणे आणि
३. शेतीला पूरक असा जोडधंदा अवलंबिने या त्रिसूत्रीचा वापर करण्यास सांगितले आहे. यास अनुसरून विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने गोवंशाच्या विविध देशी प्रजातींचे प्रदर्शन करीत वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी चारा पिकांच्या विविध जातींची लागवड पद्धती, शेणापासून गांडूळ खत निर्मिती तथा स्वच्छ दूध उत्पादन यासह दुग्ध प्रक्रिया निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान प्रदर्शित करीत शेतीला अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पूरक व्यवसायाचा उत्तम नमुना सादर केला आहे..शेतीला पूरक व्यवसाय तसेच ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीच्या मूळ उद्देशाने विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागांतर्गत पीकेव्ही कचरा ज्वलित शुष्कक, पीकेव्ही मिनी दाल मिल, पीकेव्ही सफाई व प्रतवारी यंत्र, पीकेव्ही स्क्रू पाँलिशर, पीकेव्ही मिरची बीज निष्कासन यंत्र, पीकेव्ही फळ प्रतवारी यंत्र, चेरी टूटीफ्रूटी सयंत्र, पीकेव्ही हिरवा हरभरा गाठी तोडणी यंत्र, पीकेव्ही हिरव्या शेंगा सोलणी यंत्र, पीकेव्ही कांदा लोडींग अनलोडिंग यंत्र, हळद कापणी यंत्र, सिताफळ गर व बीज निष्कासन यंत्र, कांदा प्रतवारी यंत्र, लाखोळी डाळ मिल इत्यादी यंत्रांचे कृती प्रात्यक्षिकासह दर्शविण्यात आलेव्यापारी शेतीच्या दृष्टिकोनातून नागार्जुन वनौषधी विभागातर्फे विविध औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवड तंत्र सह तिखाडी तेल, पानपिंपळी गवती चहा तेल, अश्वगंधा चूर्ण, अडुळसा चूर्ण या उत्पादनासह विविध औषधी सुगंधी वनस्पतीं चे बियाने खरेदी करणे करता उपलब्ध करून दिली गेली. आंतरराष्ट्रीय भरत धान्य वर्षाचे औचित्य साधत विविध प्रकारच्या भरड धान्यांचे शेतकरी बंधूंनी अवलोकन करीत हे तर आपल्याला करता येऊ शकते असा आत्मविश्वास व्यक्त केला. लिंबूवर्गीय पिकांच्या प्रक्षेत्रावर मेळघाटातील आदिवासी बंधूंनी कुलू करून सोबत चर्चा करीत आता तंत्रज्ञान वापराबाबत आम्ही देखील मागे नसल्याचे एक प्रकारे समाजाला दाखवून दिले. तेलबिया प्रक्षेत्राला भेट देत भुईमूग सूर्यफूल आधी पिकांच्या अत्याधुनिक लागवड पद्धती अतिशय तनमनतेने ऐकताना शेतकरी बांधव दिसून आले. सेंद्रिय शेती प्रक्षेत्राला भेट देणाऱ्या विद्यार्थी आणि बचत गटांचे सदस्य सोबतच सेंद्रिय शेतीचे पुरस्कार ते शेतकरी प्रत्येक गोष्टीच्या नोंदी घेताना आढळून आले. तर फळशास्त्र विभागातील रोपवाटिकेला भेट देत पुढील हंगामासाठी आपल्या शेतामध्ये कोणती फळ पिके लागवड करता येतील याबाबत शेतकरी बंधूंनी उत्सुकता दर्शविली. भाजीपाला असेल फुल पीक असतील या संदर्भातील माहिती जाणून घेताना शेतकऱ्यांचा उत्साह शीगेला पोहोचायला दिसला.
आजच्या दुसऱ्या दिवशी चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना शास्त्रज्ञांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक संशोधन डॉ. व्हि. के. खर्चे, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ.सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्या शिवार फेरीचा शेवटचा दिवस असून भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उद्याच्या शिवार फेरीत सहभागी होतील.