दहावी व बारावीच्या खाजगी परिक्षार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फॉर्म नं. 17 भरण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत
अमरावती दि. 03 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र( इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. जे विद्यार्थी उपरोक्त मुदतीत नाव नोंदणी करु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 25 रुपये विलंब शुल्क 15 ऑक्टोबर पर्यंत भरुन नाव नोंदणी करता येईल. तसेच अतिविलंब शुल्क 20 रुपये भरुन 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता येईल.
खाजगी विद्यार्थ्यांनी इ. दहावी व इ. बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढीलप्रमाणे संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. इयत्ता दहावी http://form१७.mh-ssc.ac.in, इयत्ता बारावी http://form१७.mh-hsc.ac.in
विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञा पत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (Compulsory) आहे.
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठवावी. तसेच संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.
विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत. खाजगी विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील पुढीलप्रमाणे इ. दहावी रु 1000/- नोंदणी शुल्क रु. 100, इ. बारावी रु 600/- नोंदणी शुल्क रु. 100 आहे. यासंबंधी महत्वाच्या पुढीलप्रमाणे दिल्या आहेत.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय माध्यमिक शाळांची यादी दिसेल त्यापैकी विद्यार्थ्याची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पध्दत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे, याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता, त्याने निवडलेलली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील विद्यार्थ्याची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.
इ.दहावी व इ.बारावी फेब्रु-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं 17 नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोच पावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नावनोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची नोंद घ्यावी.
दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र (Eligibility Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.
पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Application Form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 14 खाजगी विद्यार्थी विलंब/अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्याकरिता अंतिम मुदत ही दि. 31 ऑक्टोबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घेवून उचित कार्यवाही करावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव, अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.