महिला आयोग आपल्या दारी गुरूवारी अकोला जिल्ह्यात
महिलांनी पुढाकार घेत तक्रारी मांडाव्यात
– रुपाली चाकणकर यांचे आवाहन
अकोला, दि. 7 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अकोला जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरूवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी नियोजनभवनात सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या उपस्थित राहतील. जिल्ह्यातील महिलाभगिनींनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले आहे.
महिलाभगिनींच्या तक्रारीचे जिल्ह्याच्या ठिकाणीच निराकरण व्हावे यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी जन सुनावणी व महिला आणि बालकांच्या विविध विषयांसंदर्भात अकोला जिल्ह्याची आढावा बैठक होईल.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेसोबत उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी यावेळी उपस्थित राहणार असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. या उपक्रमातून कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे, असे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.