सुटीवर आलेल्या सैनिकाची आत्महत्या
उत्तराखंड येथे सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेल्या ३० वर्षीय सैनिकाने सुटीवर आला असता गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, ९ ऑक्टोबरली सकाळी गायगाव शिवारात व्याळा रस्त्यावर उघडकीस आली.
मूळचे अकोला नजीकच्या चाचोंडी येथील रहिवाशी सतीश अशोक तायडे (३०) हे सैनिक उत्तराखंड येथे सशत्र सुरक्षा दलमध्ये कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वी ते सुटीवर आले होते. काही वर्षांपासून बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे ते पत्नी व दोन मुलांसह सासरी वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी गायगाव शिवारात व्याळा रस्त्यावर निंबाच्या झाडाला गळफास घेतलेला त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे व सहकारी लगेच पोहचले व मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. सोमवारी संध्याकाळी चाचोंडी या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.
प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे