अमृत कलश यात्रेत विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अकोला, दि. 12 : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमात जिल्ह्यातील गावोगावच्या मृदेचे संकलन करून अमृत कलश अकोला येथे अमृत वाटिका येथे दाखल झाले. यानिमित्त हुतात्मा स्मारक ते महापालिका शाळा क्र. 16 येथील अमृत वाटिकेपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महापालिका उपायुक्त गीता वंजारी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातून ठिकठिकाणांहून अमृत कलश घेऊन आलेली वाहने रॅलीत सहभागी होती. विद्यार्थीही विविध महापुरूषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही रॅलीला मोठा प्रतिसाद होता. अत्यंत उत्साहात काढण्यात आलेल्या या रॅलीद्वारे देशभक्तीचा जागर करण्यात आला. अमृत वाटिका येथे जिल्ह्यातील सर्व कलशांचे संकलन करण्यात आले.
यानंतर जिल्ह्यातून 9 कलश दि. 25 ऑक्टोबर रोजी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांमार्फत मुंबईमार्गे दिल्लीसाठी रवाना होतील. देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. दि. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.