लघु उद्योग विकासासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांसाठी कार्यशाळा

लघु उद्योग विकासासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला दि. 17 : उद्योग व सेवा क्षेत्रात नवनवे बदल होत असून, अनेक संधी निर्माण होत आहेत.  त्यानुसार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा साधण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, निर्यातदार, प्रक्रिया उत्पादक, नवउद्योजक यांच्यासाठी आयसीएआयभवन येथे विनामूल्य कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, भारतीय पॅकेजिंग संस्थानचे सहसंचालक डॉ. बादल देवांगन, ‘मिटकॉन’चे प्रकल्प अधिकारी प्रभाकर चौधरी,   उद्योग उपसंचालक रंजना पोळ, सनदी लेखापाल संघटनेचे अध्यक्ष सीमा बाहेती, केंद्रिय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे प्रशिक्षण विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, उत्पादन व सेवा क्षेत्रात सूक्ष्म, लघु व मध्यम  उद्योगांची महत्वाची भूमिका आहे. पुढील पाच वर्षांत वेगवान विकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार तालुका आणि जिल्हा स्तरावर सूक्ष्म नियोजन करून अनेक प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाची स्टार्टअप पॉलिसी त्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

      छोट्या व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.  उद्योजक, व्यावसायिक, निर्यातदार, शेतकरी संस्था, औद्योगिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांचा कार्यशाळेत सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news