वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
नवी मुंबई – ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी देश विदेशातील जनतेवर गारुड केलं होतं.
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण होते बाबामहाराज सातारकर?
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती.
वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. 1962 साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वर अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.
आपल्या अनोख्या कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायाचे विचार त्यांनी घराघरात पोहोचवले. श्रीविठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरीतील विचारधारा बाबामहाराजांनी सामान्यांपर्यंत अत्यंत सामान्य भाषेत पोहोचवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाबामहाराजांचं नाव पोहोचलं आहेच, पण त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाचे देशविदेशातही चाहते आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम कमी झाले होते, परंतु त्यांचा नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news