सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा – रविकांत तुपकर
अकोला:- राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. त्याच्या शेतमालाला दरवाढ मिळाली पाहिजे, पिकांचे नुकसान झाल्याने एकरी १० हजार रुपयांची मदत भेटायला हवी. यासह इतर प्रमुख प्रश्नांवर हा लढा सुरु केला असून पक्षविरहीत आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या एल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी स्थानिक विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधला. श्री. तुपकर म्हणाले, महाराष्ट्रात सोयाबीनचा ५० लाख ८५ हजार ५८९ हेक्टर पेरा आहे. कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. परंतु तरीही सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील नाही. त्यामुळे सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांना न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे. पिवळा मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानापोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रुपये भाव द्यावा, चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीला तार किंवा सिमेंटचे मजबूत कंपाऊंड मिळावे, सोयापेंडीची आयात थांबवून निर्यात करावी, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे अशा विविध मागण्यांसाठी हा लढा सुरु केला आहे.
तुपकर पुढे म्हणाले, १ नोव्हेंबर रोजी शेगाव येथून एल्गार रथयात्रेला सुरुवात होईल. बुलडाण्यात २० नोव्हेंबरला एल्गार महामोर्चा निघणार आहे. मागील काळात केलेल्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली याची संपुर्ण माहितीही त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला अमित अढाऊ, चंद्रशेखर गवळी, सुरेश जोगळे, प्रशांत गावंडे, कपिल ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.