अकोल्याच्या पातूर तालुक्यात असलेल्या चरणगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावबंदीनंतर रविवारी साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. शनिवारपासून ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात आंदोलनाचा बिगुल वाजला आहे. काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला आहे. आरक्षण न मिळाल्याने त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून चरणगाव येथे मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदीचे फलक लावत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर आता गावातच चौकांमध्ये एकत्र येऊन साखळी उपोषण प्रारंभ केले आहे.