कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना

कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना

अकोला, दि. 7 : मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी सादर करण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तालुकास्तरावरही अभिलेखांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. आता समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय कक्ष तत्काळ स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष तत्काळ कार्यान्वित करण्यात आला असून, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील हे कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. सर्व जिल्हास्तरीय कार्यालयप्रमुख हे सदस्य आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार अभिलेखांची तपासणी करण्यासाठी संबंधित विभागांचे अभिलेख कक्षास भेट देणे, संबंधित विभागाने सादर केलेली माहिती व अभिलेखांची तपासणी करणे ही संपूर्ण कार्यवाही या कक्षाद्वारे  होणार आहे.

सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेख्याची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले असून, विविध कार्यालयांद्वारे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

या कार्याला गती मिळण्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून, महसूली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news