चरणगाव येथील मराठा आरक्षण साखळी उपोषणाला पातूर तहसीलदारांची भेट!
अकोला-मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पातुर तालुक्यातील चरणगाव येथे साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान पातुर तहसीलदार रवी काळे यांनी मंगळवार ता.७ रोजी सदर उपोषणस्थळी भेट देऊन येथील मराठा बांधवांशी चर्चा केली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा आदेश येईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत पातुर तालुक्यातील चरणगाव या गावाने लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम गावबंदी करून साखळी उपोषण सुरू केले होते.दरम्यान शासनाला दोन महिन्याचा अवधी देवून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना दिल्या.त्यामुळे चरणगाव येथील मराठा बांधवांनी सुद्धा उपोषण सुरूच ठेवले असून जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्यावर उपोषण कर्ते ठाम आहेत.या साखळी उपोषणस्थळी गरजवंत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.