नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अवेळी पावसाने शेतीचे नुकसान

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि. २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात अवेळी पावसाने शेती व फळपिकांच्या नुकसानाबाबत सविस्तर पंचनामे व सर्वेक्षण करावे. तालुकास्तरावर संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

अवेळी पावसाने अंदाजे ४ हजार ६०८ हे. शेतजमीनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात ४ हजार ५७६ हे. क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे , तर तेल्हारा तालुक्यात ३२ हे. वर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या. पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांच्याकडील एक गाय दगावली.


गायी-म्हशींमधील वंधत्व निवारण्यासाठी अभियान

 पशुसंवर्धन विभागाकडून गावोगाव शिबिरे

अकोला, दि. २८  : शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी वंधत्व निवारण अभियानाला जिल्ह्यात  सुरुवात झाली आहे. मोहिमेत दि. १९ डिसेंबरपर्यंत गावोगाव शिबिरांद्वारे गाई-म्हशींची तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी आज सांगितले.

राज्यातील पैदासक्षम गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणा-या गाई-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाई-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण शिबिर घेण्यात येणार आहे.

शिबिरात पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येईल. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाई-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, वंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. ज्या जनावरात सलग तीन आठवडे वजनात घट दिसून येते, त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज १ किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे.

तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गाई-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

       गाई- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे याबाबत उपाययोजनेसाठी पशुपालकांनी या अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


महिला सन्मान बचतपत्र योजनेचा लाभ

घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

           अकोला, दि. २८ :  महिला सशक्तीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना लागू असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.

          या योजनेमार्फत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी रू. 1 हजार रू. ते जास्तीत जास्त रू. 2 लाख जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. त्यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे सादर करावे लागतात. खातेदार दि. 31 मार्च 2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून खाते काढू शकतो.

          महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व डाक कार्यालयात “नारी शक्ती” महिला बचतपत्र अभियानही राबविण्यात येत आहे.

          अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व महिलांनी महिला सन्मान बचतपत्र योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.


तेल्हारा तालुक्यात सघन कुक्कुट विकास गट स्थापणार

अकोला, दि. २८ : तेल्हारा तालुक्यात सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वापर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समितीकडून घेण्यात आला. या योजनेत ५० टक्के अनुदान देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थींनी तेल्हारा पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news