पुढील २४ तासात पावसाची शक्यता
अकोला दि. २९ : नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संदेशानुसार, दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अकोला जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. या स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे.
चोहट्टा बाजार जि. प. सर्कल पोटनिवडणूक
मतमोजणी अकोटला होणार
अकोला, दि. २८ : अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. अकोट येथील तहसील कार्यालय हे मतमोजणी केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रमाची अनुसूची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून निर्गमित करण्यात आली. त्यानुसार
दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत अकोट उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी अकोट येथील उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे.
अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी, तर अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी व निशाणी वाटप अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी व अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३.३० नंतर होईल. मतदान केंद्राची यादी दि. १३ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आणि मतमोजणी दि. १८ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून होईल. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव २१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहील.
०००