जरांगे पाटलांची चरणगावातील सभा ऐतिहासिक ठरणार
अकोला- सर्व जाती-जमातींना सोबत घेऊन आपल्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी आयोजित मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची दिनांक 5 डिसेंबर रोजी चरणगाव येथे आयोजित सभा ऐतिहासिक ठरणार असून त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती चरणगाव येथील राजेश देशमुख यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक सभेची संपूर्ण माहिती देण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची विदर्भातील ही सर्वात मोठी सभा असून तालुका व शहरी भागात ही सभा न ठेवता ग्रामीण जनतेंना समस्या कळाव्यात यासाठी चरणगाव सारख्या खेड्यात राज्यातील ही पहिली सभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दीडशे एकराच्या शेतात ही सभा होत असून या सभेच्या सफलतेसाठी विविध समित्या सकल मराठा समाजाच्या वतीने तयार करण्यात आल्या आहेत.कास्तकाऱ्यांनी आपल्या बिना पेरणीच्या शेती या सभांसाठी दिल्याआहेत. सभेत येण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर पार्किंगची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून बाहेर गावातील येणाऱ्या मंडळींची निवास व भोजन व व्यवस्था गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आली आहे. केवळ मराठाच नव्हे किंबहुना कुणबी, माळी, तेली, मुस्लिम, बौद्ध, आदी अठरा पगड जाती-जमातीचे शेकडो कार्यकर्ते या सभेत येणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या राज्यातील सभांना अभुतपूर्व प्रतिसाद मिळत असून यानिमित्ताने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. राज्य शासनाने त्यांच्या सुरक्षितेत वाढ करावी व त्यांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. जरांगे यांचे उपोषण हे आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. सर्वांना या सभेत जरांगे पाटलांना ऐकण्याची संधी मिळावी यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात आले असून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी सभेची व्यवस्था करणार आहेत. मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पातुर तालुक्यातील चरणगाव येथे आयोजित या सभेस सर्व समाजाच्या महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी चरणगाव येथील श्रीकांत देशमुख, दादाराव पाथरीकर, प्रमोद धर्माळे, विकास पागृत तथा गजानन हरणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.