राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 14 डिसेंबरपासून केळीवेळीत
–मराठी अभिनेत्रींसह मान्यवरांची मांदीयाळी–
अकोला-श्री हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ केळीवेळी यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 14, 15, 16 व 17 डिसेंबर 2023 रोजी भव्य प्रमाणात करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक, माजी आम. गजाननराव दाळू गुरुजी,मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सेंट्रल प्लाझा सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत या राष्ट्रीय स्पर्धेची माहिती देण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील केळीवेळी हे गांव देशाच्या नकाशावर कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. यावर्षी होणारी ही कबड्डी स्पर्धा ह्या मंडळाचे खेळाडू डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ होत असून चषकाचे नाव रामकृष्णआप्पा मिटकरी चषक राहणार आहे. केळीवेळी कबड्डी लिग या नावाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मराठी सिने क्षेत्रातील अभिनेत्रींना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दि 14 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता केळीवेळी येथील हनुमान क्रीडा संकुलातील मैदानावर होणार आहे. पुरुष स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महिला स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती गोदावरी रामकृष्णाआप्पा मिटकरी यांच्या हस्ते होणार असून या उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरु तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर,हभप सोपानकाका शेलार, डॉ. पं.दे.कृ.वि. चे कुलसचिव सुधीर राठोड, ह.भ.प. रतन महाराज वसु, अकोटचे उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत विविध संस्था व मान्यवरांच्या वतीने बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यात पुरुष विभागात प्रथम बक्षीस 1 लाख रुपयांचे व महिला विभागात प्रथम बक्षीस 71 हजार ठेवण्यात आले आहे. पुरुष विभागातील द्वितीय बक्षीस 71 हजार तृतीय बक्षीस 51 हजार रुपये, वैयक्तिक बक्षीस 15 हजार समवेत ऑल राऊंडर 11 हजार,बेस्ट रेडर साठी 7 हजार,बेस्ट कचीयर 7 हजार ,मॅन ऑफ द डे साठी 2 हजार रुपये तथा प्रत्येक खेळाडूला एक सायकल बहाल करण्यात येणार आहे. महिला विभागात द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये,तृतीय 31 हजार रुपये, वैयक्तिक 11 हजार रुपये, ऑलराऊंडर 7 हजार,बेस्ट रेडर 5 हजार,बेस्ट कचीयर 5 हजार व उत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी प्रत्येकी एक सायकल असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.या स्पर्धेत दि. 15 डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून उद्योजक सुगत वाघमारे उपस्थित राहणार असून हा सोहळा कोंबडी पळाली फेम, सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या हस्ते होणार आहे. दि 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या सत्कार सोहळा व धनंजय मिश्रा संपादित ‘‘कबड्डीचे वारकरी’’ स्मरणिकेचे विमोचन सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते होणार असून सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. वासुदेव महाराज खोले गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा व युवक कल्याण अमरावतीचे उपसंचालक विजय संतान यांची उपस्थिती लाभणार आहे. दि.17 डिसेंबर रोजी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पं.दे.कृ.वि. चे कुलगरु डॉ. शरद गडाख हें राहणार असून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते बक्षिस वितरण व डॉ. राजकुमार बुले यांचा सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला महाभारतात बलरामाची भूमिका साकारणारे सागर साळुंके यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गजाननराव दाळू गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मंडळाचे संजयभाऊ चौधरी, कमलेशभाऊ गावंडे, अनिल गासे, धनंजयभाऊ मिश्रा, किशोर बुले, बाळु आढे,मुंबई येथील रणनिती इव्हेंट मॅनेजमेंटचे आकाश मसराम, सुराज कुटे, पिआरओ प्रशांत भटकर, प्रा पवन राठोड,आकाश हेरोळे व सहकारी उपस्थित होते.