17 डिसेंबर ची संशोधन अधिछात्रवृती परीक्षा रद्द करण्याची कृषी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी
अकोला-महाज्योती,बार्टी आदी संस्थेमार्फ आगामी दि 17 डिसेंबर रोजी होऊ घातलेली संशोधन अधिछात्रवृती परीक्षा रद्द करण्याची मागणी कृषी संशोधक विद्यार्थ्यांनी केली असून या संदर्भात दि 13 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर राज्यभरातील कृषी संशोधक विद्यार्थ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचा इशारा कृषी विद्यापीठ पीचडी विद्यार्थ्यांनी दिला.शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत या विद्यार्थ्यांनी या अन्यायाच्या संदर्भात माहिती दिली.
राज्यात अनुसूचित जाती व जमाती, ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. सन 2021 मध्ये 957 विद्यार्थ्यांना तर 2022 मध्ये 1226 विद्यार्थ्यांना सरसकटअधिछात्रवृत्ती देण्यात आली होती. सर्व पात्र विद्यार्थ्यांना ही अधिछात्रवृत्ती देण्यात आली होती. 2023 मध्ये शासनाने फक्त 200 विद्यार्थ्यांना ही अधिछात्रवृत्ती दिली जाईल अशी जाहिरात काढली, त्या माध्यमातून 200 विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात गेली 40 दिवस- 30 ऑक्टोबर 6 डिसेंबर 2023 पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते.नुकतेच महाज्योती संस्थेच्या वतीने नवीन नोटिफिकेशन देण्यात आले. यानुसार 17 डिसेंबर 2023 तारखेला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.
या परीक्षेमध्ये दिलेले अभ्यासक्रम हे पूर्वी दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सुरुवातीला जो दिलेला अभ्यासक्रम होता तो विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यात त्यानुसार अभ्यास केलेला असेल परत आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना 5-7 दिवसात अभ्यास करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरती होणारा मोठा अन्याय आहे. अचानकपणे काढलेले महाज्योती परीक्षेचे वेळापत्रक आणि अभ्यासक्रमात केलेला बदल विद्यार्थ्यांना मान्य नाही. यापूर्वी जो दिलेला अभ्यासक्रम होता तर त्यामधे कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यासक्रम नमूद केलेला होता. परंतु ४ डिसेंबर रोजी आलेल्या नोटीस मधे कुठलीही पूर्वकल्पना न देता सर्वांसाठी सारखा अभयासक्रम केलेला असून इतक्या कमी कालावधीमध्ये कुठल्या पध्दतीने परीक्षेची तयारी करावी. हा विद्यार्थ्यांवर शासनाने केलेला अन्याय आहे.या अन्यायाच्या निराकरण साठी हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत यावेळी कृषी विद्यापीठचे संशोधक विद्यार्थी शुभम पाटील, कल्याणी मोरे, चंचल दाढे,नागेश लिंगायत,निशांत झटाले, मोही जनबंधू शुभम महाजन हनुमंत लंगोटे सुजाता गायकवाड स्नेहल डावरे वैभव बनसोड अमृता एकापुढे बाळकृष्ण घोडके धनंजय शिरसाट शुभम काकड गौरव मिटकर वैभव गुलाने चेतन निचळ आदी उपस्थित होते.