शेत रस्त्याबाबतचे वाद मिटविण्यात प्रशासनाला यश – जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्याचे सत्कार
अकोला, दि.१३: बाळापूर महसूल विभागातील काही गावात असणारे शेतकऱ्यांचे शेत रस्त्याबाबतचे वाद नायब तहसीलदार सै. ऐहसानोद्दिन यांच्या पुढाकाराने मिटविण्यात यश आलें आहे. झुरळ खु. उरळ खु.गावाला लागलेले रस्त्याचे ग्रहण तसेच खिरपुरी बु,वाडेगाव येथील अनेक वर्षांपासून शेत रस्त्याबाबत असलेला वाद प्रशासनाच्या पुढाकाराने मिटविण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
वाडेगाव भाग क्रमांक तीनमधील ‘मामोजी वाट’ या रस्त्यावरील दोन शेतकऱ्यांच्या बांधावरील असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करीत असल्याने इतर शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे वाद निर्माण झाला होता त्यामुळे नायब तहसिलदार सैय्यद ऐहसानोद्दीन यांच्या कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. नायब तहसीलदार महसूल यांनी सदर रस्त्याचे स्थळ निरीक्षण करीत असताना दोन्ही शेतकऱ्यांना सदर रस्ता मोकळा करण्याबाबत त्या रस्त्यावरून जाणाऱ्या उपस्थित असलेले सर्व शेतकऱ्यांची सभा घेऊन व समजावून आपसात प्रकरण मिटविण्यासाठी सांगण्यात आल्यावरून दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्याचा अडथळा त्या शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील लहान झाडे व फांद्या तोडून रस्ता मोकळा केला.
सत्कारावेळी नायब तहसीलदार ऐहसानोद्दीन, मंडळ अधिकारी सी.सी. बोळे, तलाठी राम लंगोटे, लोपमुद्रा कोठूळे, नारायण घाटोळ, शेतकरी मनोहर राहणे, गजानन मानकर, शिवलाल लोखंडे, विनोद मानकर, सुनिल मानकर, रामराव मानकर, दत्तात्रय मानकर आदी शेतकरी उपस्थित होते.
अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अकोला, दि. १३ : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तांवरील मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे.
ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रूवारी 2024 ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम भरल्यास जास्त सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना व सदर योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या संकेतस्थळावर (igrmaharashtra.gov.in) उपलब्ध आहे.
तसेच सदर योजनेसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी, अकोला किंवा नजिकच्या सह दुय्यम निबंधक /दुय्यम निबंधक कार्यालय, अकोला जिल्हा यांचे कार्यालयात अर्ज करता येईल.
तरी अकोला जिल्ह्यातील पक्षकारांनी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 चा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
अकोला, दि : १३ : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने ५२ क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार असून जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र बिटोडे यांनी केले आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ कालावधीत जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
जागतीक कौशल्य स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे, या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हयातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणा-या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in या महास्वयंम वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असावा. तसेच,आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन & वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. याप्रमाणे फ्रांन्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटेलिटी इंस्टीट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी कडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल कळविण्यात आले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेत नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ पर्यंत असून स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in लिंकवर भेट देऊन नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करावा,असे आवाहन ग.प्र बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.
प्रेरणा प्रकल्प अंतर्गत तणावमुक्त शिबिर संपन्न
अकोला, दि १३ : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प अंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्द्र,मळसुर ता. पातुर येथे तणाव मुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात १५४ रुग्णांची तपासणी करण्यात आले व ३६ रुग्णांना औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले.
मानसोपचार तज्ञ डॉ. अश्विन करवंदे यांनी मानसिक आजाराबाबत स्मृतिभ्रंश, डिप्रेशन, व्यसनमुक्ती व इतर मानसिक आजाराबाबत व टेलीमानस १४४१६ या टोल फ्री नंबरबाबत मार्गदर्शन केले.वैद्यकिय अधिकारी रुचिका खंडाळे, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ प्रदिप इंगोले, सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव व सोपान अंभोरे, मनोविकृती परिचारिका प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर यांच्यासह कर्मचारी उपस्थीत होते.
उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांचे मार्गदर्शनाखाली राबविलेल्या तणाव मुक्त शिबिर यशस्वी करण्याकरीता,सय्यद आरीफ,कविता रिठ्ठे व शल्य चिकित्सक कार्यालयाचे कर्मचारी गटप्रर्वतक, आशा स्वयंसेवीकायांनी सहकार्य केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने रोजगार भरती मेळावा
अकोला, दि. 13: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला व सुझुकी मोटर्स, गुजरात, प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने 22 डीसेंबर रोजी सकाळी 9-00 वाजता शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट,अकोला येथे रोजगार भरती मेळावाआयोजित केलेला आहे. यामध्ये फीटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मेकॅनिक, पेन्टरजनरल, मशिनिष्ट, मोटारमेकॅनिक, टुल अॅन्ड डायमेकर, पि. पि. ओ., ट्रॅक्टरमेकॅनिक, सि. ओ. ई. ऑटोमोबाईल या व्यवसायातील आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित कंपनी मार्फत रोजगार देण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले अधिक माहितीसाठी कार्यालयास भेट देण्यात यावी असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केन्द्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला यांनी कळविले आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध
अकोला, दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदारांनी त्याचे अवलोकन करून परिचलन प्रक्रिया जाणून घ्यावी व शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमशीनचे प्रशिक्षण , प्रसार प्रसिद्धी व जनजागृती होत आहे.
ईव्हीएम व डब्ल्यूपॅट मशीनच्या प्रशिक्षण , प्रसार , प्रसिद्धी व जनजागृती या करीता जिल्ह्यात असलेल्या एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स प्रशिक्षणसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
त्या अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे (ईडीसी) क्रियान्वीत करण्यात आलेली आहेत. उपरोक्त ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे (ईडीसी) निवडणूकीची घोषणा होईपर्यंत सुरू राहणार आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी भुसंपादन काटेपुर्णा मोर्णा प्रकल्प यांचे कार्यालयात त्याचप्रमाणे 28 अकोट, 29 बाळापूर, 30 अकोला पश्चिम, 31 अकोला पुर्व व 32 मुर्तीजापूर या विधानसभा मतदार संघांचे संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयातंर्गत उपविभाग मुख्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे (ईडीसी) येथे भेट देणारे नागरीकांना ईव्हीएम मशिन्सची परिचालन प्रक्रीया प्रत्यक्ष बघता येईल तसेच प्रारूप मतदान करून त्यांनी केलेले मतदान व्हीव्हीपॅट यंत्राचे द्वारे पडताळून बघता येईल.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी , अकोला यांचे वतीने नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जिल्हा धिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ईव्हीएम डेमोस्ट्रेशन सेंटर (ईडीसी) ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रास भेट देऊन ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची परिचालन प्रक्रीया स्वत: बघावी तसेच प्रारूप मतदान करून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिन्स बाबत सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे. सदर ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहील याची नेांद घ्यावी.