अकोला येथे राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्र ” ॲग्रोटेक” चे आयोजन!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला यांचा संयुक्त उपक्रम!
भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी “ॲग्रोटेक 2023 ” साठी कृषी विद्यापीठात तयारीला सुरुवात !
कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2023 दरम्यान संपन्न होणाऱ्या तीन दिवसीय राज्यस्तरीय “ॲग्रोटेक 2023” या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजनाच्या प्रत्यक्ष तयारीला आज कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे शुभहस्ते भूमीपूजन करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे सह इव्हेंट मॅनेजर आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे समन्वयातून आयोजित या भव्य दिव्य प्रदर्शनीचे उदघाटन येत्या 27 डिसेंबर 2023 रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहे.
केवळ विदर्भात नव्हे तर राज्यासह देशभरातील शेतकरी बंधू -भगिनींना, युवक- युवतींना या प्रदर्शनीची ओढ लागलेली असते. यंदा सुद्धा अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शनी,कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू मा. डॉ.शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून चार मोठे डोम, व इतर माध्यमातून 400 हून अधिक स्टॉल उभारण्यात येणार असून ज्यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज सह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांच्या उत्पादक कंपन्या, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बी-बियाणे खते,औषधे, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वयं सहाय्य बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने, व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील समाविष्ट आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे,पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती,फळे- फुले, रानभाज्या आदींचे प्रदर्शन निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे. प्रदर्शनी ची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत असून ही प्रदर्शनी राज्यासह देशातील बंधू-भगिनी, युवक- युवतीना रोजगार – स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी प्रत्यक्ष अनुभवत आत्मसात करण्याची एक पर्वणीच ठरणार आहे.
तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह राज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे सर्वच अधिकारी – कर्मचारी, कृषीमित्र शुअरशॉट इव्हेंट्सचे प्रतिनिधी व त्यांची चमू अथक परिश्रम घेत आहेत. समस्त शेतकरी बंधू -भगिनी, कृषीशी निगडित मंडळीं, तरुण युवक – युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनीनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आत्मा समिती अध्यक्ष अजित कुंभार , विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे(अमरावती ) व डॉ.राजेंद्र साबळे (नागपूर)यांनी केले आहे.