पोलिसाच्या बायकोवर सहकाऱ्याकडूनच अत्याचार, फेसबुकवर मैत्री करुन जाळ्यात ओढलं!
अकोला प्रती – एका पोलिसावर सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या पोलिसाने आधी सहकाऱ्याच्या पत्नीसोबत मैत्री केली, मग तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याची तक्रार आहे. अकोल्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून असा त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आधी शिवमने पीड़ित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली, नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे. दीर्घ काळाने आरोपी ब्लॅकमेल करायला लागला असल्याचंही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेने अकोला पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार, अकोला पोलिस दलात रामदास पेठ पोलिस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे (पोलिस कर्मचारी) हा कार्यरत होता. यादरम्यान, त्याची एका पोलिस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. शिवम त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या घरी येणं जाणं होतं. याचदरम्यान, त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती. शिवम या नराधम पोलिस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिने ते मंजुरी केली आणि तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कालांतरानं शिवम मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. हा प्रकार तिने पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सद्यस्थितीत शिवमवर आकोट शहर पोलिस ठाण्यात ५२६/२०२३ कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ (ड) ३७६(१) (ए)३७६(२) (न) ३७६ (३) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास एपीआय योगिता ठाकरे करीत आहेत.