जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे प्रयत्नातुन सेवानिवृत्त कर्मचा-यास मिळणार सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान रक्कम
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला हे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मार्गदर्शनानुसार कार्यरत आहे. अर्जदार भास्कर उकर्डा उगले, रा. रा. तांदळी, ता. पातुर, जि. अकोला यांनी दि. १३/०९/२०२३ रोजी त्यांचे विधीज्ञ श्री. गजानन भोपळे यांचे मार्फत जि.वि.से.प्रा., अकोला यांचेकडे अर्ज देवून विनंती केली की, त्यांची शासकीय कार्यालयांनी रोखलेली उपदान रक्कम व सेवानिवृत्तीची वेतनाची रक्कमे संबंधीचा वाद मिटविण्यासाठी सहकार्य करावे. अर्जदार हा लघुपाटबंधारे उपविभाग पातुर येथे कार्यरत होते व दिनांक ३१/१०/२०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. अर्जदार याने चार विविध पतसंस्थाकडून खुप वर्षाआधी कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न झाल्यामुळे अर्जदाराचे सेवानिवृत्ती वेतन तसेच उपदान रक्कम मागील ७ वर्षापासून रोखून ठेवण्यात आली होती.
जि.वि.से.प्रा., अकोला यांनी सर्व संबंधीतांना नोटीस काढून कार्यालयात बोलाविले. त्या चार विविध पतसंस्था यांनी चेर्चेअंती नियमाप्रमाणे कर्ज आणि व्याजाची रक्कम माफ करण्याची तयारी दाखविली. तसेच अर्जदार ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या लघुपाटबंधारे विभागाने चर्चेअंती अर्जदारास त्याचे रोखलेली उपदान व सेवानिवृत्ती वेतन नियमाप्रमाणे देण्याचे मान्य केले. सदरचे प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला चे सचिव, श्री. योगेश सु. पैठणकर यांनी मध्यस्थी केली आणि सामोपचाराने वाद मिटविण्यात आला. याबद्दल अर्जदार भास्कर उकर्डा उगले यांनी समाधान व्यक्त केले. अर्जदाराचे विधीज्ञ श्री. गजानन भोपळे यांनी देखील मध्यस्थी करुन प्रकरण सामोपचाराने मिटविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे आभार मानले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला येथे कोणत्याही प्रकारचे वाद हे सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अकोला जिल्हयातील नागरीकांनी त्यांचे वाद मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. योगेश सु. पैठणकर, सचिव यांनी केले. संपर्काकरीता दुरध्वनी कमांक दूरध्वनी क. ०७२४-२४१०१४५, मो.क.८५९१९०३९३०
श्री. भास्कर उकर्डा उगले यांचे मनोगत :-
मी लघुपाटबंधारे विभाग, जि. प. पातुर येथे कार्यरत होतो. सन २०१६ मध्ये मी सेवानिवृत्त झालो. मी काही पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. परंतु माझया वैयक्तिक अडचणीमुळे वेळेत कर्जाची परतफेड करु शकलो नाही. त्यामुळे माझे सेवानिवृत्ती वेतन तसेच उपदान रक्कम रोखून ठेवण्यात आली होती. सदरची बाब मी माझे ओळखीचे विधीज्ञ श्री. गजानन भोपळे यांना सांगीतली. त्यांनी त्वरीत मला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला या कार्यालयात घेवून गेले. विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे माझी खुप मोठी अडचण दुर होण्यास मदत झाली.
-: विधिज्ञ श्री. गजानन भोपळे यांचे मनोगत :-
माझे ओळखीचे पक्षकार श्री. भास्कर उकर्डा उगले हे, लघुपाटबंधारे विभाग, जि. प. पातुर येथे कार्यरत होते. सन २०१६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. परंतु त्यांची संबंधीत खात्याने सेवानिवृत्ती वेतन तसेच उपदान रक्कम रोखून ठेवलेली होती. सदरची बाब मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव, श्री. योगेश सु. पैठणकर यांना सांगीतली. त्यांनी सदरचे प्रकरणात मध्यस्थी करुन अर्जदारास त्याचे सेवानिवृत्ती वेतन तसेच उपदान रक्कम मिळून देण्यास सहकार्य केले.