राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन, कृषि महोत्सव व चर्चासत्र उद्यापासून!
तीन दिवसीय राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी चे उद्या शानदार उद्घाटन!
उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे., उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची लाभणार उपस्थिती.
कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते पार पडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अकोला जिल्ह्याचे खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री ॲड. संजय धोत्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संगीता आढाऊ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख विशेष अतिथी म्हणून या उद्घाटन सत्राचे प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तर विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.विप्लव बाजोरिया , विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधान परिषद सदस्य आ.ॲड.किरण सरनाईक, विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधान परिषद सदस्य आ. धीरज लिंगाडे, ज्येष्ठ विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, विधानसभा सदस्य आ. हरीश पिंपळे, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. डॉ. संजय रायमूलकर, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. अमित झनक, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. रणधीर सावरकर, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, यांचे सह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय माहोरकर, प्रशांत कुकडे, जनार्दन मोगल, केशवराव तायडे, श्रीमती हेमलता अंधारे, डॉ. वाय जी प्रसाद यांचे सह अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बी. वैष्णवी,अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, विद्यापीठ कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.
केवळ विदर्भात नव्हे तर राज्यासह देशभरातील शेतकरी बंधू -भगिनींना, युवक- युवतींना या प्रदर्शनीची ओढ लागलेली असते. यंदा सुद्धा अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शनी,कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू मा. डॉ.शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून
या प्रदर्शनीमध्ये फळबाग, भाजीपाला,फुल शेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागां सोबतच राज्याचे कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत. शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार असुन कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे. याशिवाय गट शेती, स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण कृषि निविष्ठा इत्यादींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. या प्रदर्शनीमध्ये 400 हून अधिक दालने राहणार असून ही कृषी प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे,पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती,फळे- फुले, रानभाज्या आदींचे प्रदर्शन निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे. प्रदर्शनी ची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत असून ही प्रदर्शनी राज्यासह देशातील बंधू-भगिनी, युवक- युवतीना रोजगार – स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी प्रत्यक्ष अनुभवत आत्मसात करण्याची एक पर्वणीच ठरणार आहे.
तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह राज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे सर्वच अधिकारी – कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. समस्त शेतकरी बंधू -भगिनी, कृषीशी निगडित मंडळीं, तरुण युवक – युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनीनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आत्मा समिती अध्यक्ष अजित कुंभार, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे (अमरावती ) व डॉ. राजेंद्र साबळे (नागपूर) यांनी केले आहे.
डॉ. पंदेकृवीचे माजी विद्यार्थी बनले व्यावसायिक
यंदाच्या कृषी प्रदर्शनी मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारलेले उद्योग व त्यांचा अनुभव कथन करण्यासाठी उभारण्यात येणारी यशस्वी विद्यार्थी व्यावसायिकांची दालने या प्रदर्शनीचे आकर्षण ठरणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाचे कृषी पदवीधर असलेले यांनी उज्वल भविष्यासाठी आदर्श ठरणारे याच विद्यापीठातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ज्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उद्योग उभारून व इतर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत अशा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी या कृषी प्रदर्शनी दरम्यान आपापली दालने उभारणार आहेत. विद्यापीठातील कृषी पदवीधर व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन तसेच माहिती जाणून घेण्याकरिता एक सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.