राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व महोत्सवाचा शुभारंभ
वातावरणातील बदलाला अनुकूल पीकपद्धतीसाठी कृषी विद्यापीठाने संशोधनाला चालना द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला, दि. २७ : जलवायू परिवर्तन समजून घेऊन वातावरणातील बदलाला अनुकूल अशी शेतीपद्धती, तंत्रज्ञान विकसित व्हावे व शेतकरी बांधव आत्मनिर्भर व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाने योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोत्सव- ‘अॅग्रोटेक प्रदर्शन २०२३’ चा शुभारंभ विद्यापीठ क्रीडांगणात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल,अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव सुधीर राठोड, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रारंभी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते म्हणाले की, भारतात कृषी क्रांतीची सुरवात भाऊसाहेबांनी केली. त्यांनी दिल्लीत भरविलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला जगभरातील मान्यवरांची उपस्थिती होती. देशात शेती उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांनी 10 वर्षे कृषी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प राबवले. नवे तंत्रज्ञान आणले. या प्रयोगांमुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली. त्यांच्या दूरदृष्टीने विदर्भात शिक्षणाचा प्रसार झाला.
ते म्हणाले की, शेती क्षेत्रात नवी आव्हाने उभी राहिली आहेत. काळानुरूप शेतीविभाजनामुळे धारणा क्षेत्र कमी झाले. नैसर्गिक वातावरण बदलत आहे. ऋतूंच्या कालावधीत बदल होत आहेत. पर्यावरणीय बदलाला अनुकूल असे तंत्रज्ञान, वाण विकसित करणे ही कृषी विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यासाठी संशोधनाला चालना द्यावी. विद्यापीठाच्या मागणीनुसार पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, शेतीक्षेत्रासाठी मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पेरणीयंत्र, नमो शेतकरी सन्मान योजना अशा विविध योजना राबवत असतानाच, कृषी उद्योग-व्यवसाय, विपणनाला चालना देण्यात येत आहे. सहकारी संस्था कृषी व्यवसाय सोसायटी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांची दिवसा 12 तास वीजपुरवठा मागणी लक्षात घेऊन सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणले जात आहेत. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा शक्य होईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २५ टक्के अग्रीम देण्याचा निर्णयही शासनाने घेतला. कुठे तांत्रिक त्रुटी असल्यास तीही दूर करण्यात येईल.
राज्यात शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे पूर्वीपासून सातत्याने प्रयत्नरत असल्याचे आमदार श्री. सावरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. श्री. फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन तेथील उत्पादने, संशोधन, यंत्रे आदींची माहिती घेतली.
विद्यापीठाच्या ‘कृषी संवादिनी’ व विविध पुस्तकांचे प्रकाशन यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल कृषी विद्यापीठातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविक केले.
महोत्सवात दि. २९ डिसेंबरपर्यंत शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणारी शासकीय दालने, उद्योग, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे दालने, सेंद्रिय शेतमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, डाळी, इतर शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून विक्री, कृषि निविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन आदी यंत्रसामुग्रीचे विविध कंपन्यांचे स्टॉल्स, पशु पक्षी प्रदर्शन, जल साक्षरता ग्राम, गुलाबी बोंड अळींचे व्यवस्थापन आदी चर्चासत्र आणि सेंद्रिय शेतीचे लाईव्ह मॉडेलचे स्टॉल, खरेदीदार-विक्रेता सम्मेलन, गटांमार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल्स यांचा समावेश आहे. महोत्सवातील विक्रीची वेळ सकाळी ९ ते रात्री ८ अशी आहे.