नायलॉनचा मांजा न वापरण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन
अकोला, दि. २८ : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला बाधा पोहोचू नये याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पर्यावरण व पशूपक्ष्यांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे इजा व दुखापती टाळण्याच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर जिल्ह्यात कुठेही होता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
पर्यावरण संरक्षण कायद्याने नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसे प्रतिबंधात्मक आदेशही निर्गमित करण्यात येतात. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाहीही होते. तथापि, सुजाण नागरिक म्हणून नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालगृहातील पाच मुलांच्या पालकांच्या शोधाबाबत आवाहन
अकोला, दि. २८ : बालगृहात दाखल पाच मुलांच्या पालकांचा शोध जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून घेण्यात येत असून, पालक, नातेवाईक, माहितगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला येथील शासकीय बालगृहात चंदन गोविंद चव्हाण हा दि. १९ जून २०२२ पासून, तसेच युवराज माणिकराव घुगे दि. २१ ऑगस्ट २०२१ पासून दाखल आहे. गायत्री बालिकाश्रम येथे राणी प्रेमलाल शिंदे ही बालिका दि. ७ जुलै २०२१ पासून दाखल आहे. सूर्योदय बालगृहात करण, तसेच विनोद सुनील चौगुले हे दोन १५ वर्षांचे बालक दि. १३ डिसेंबर २०१२ पासून दाखल आहेत.
या मुलांच्या पालक, नातेवाईक व माहितगारांनी कक्षात, तसेच गायत्री बालिकाश्रम (भ्र. क्र. ९८८१४७७५७३), सूर्योदय बालगृह (भ्र. क्र. ९०२८२३२०७७), शासकीय बालगृह (भ्र. क्र. ८२०८९७७५२२) किंवा ९४२१४६४५६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिका-यांनी केले आहे.
मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी २२ जानेवारीला
अकोला, दि. २८ : छायाचित्र मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमातील सुधारणेनुसार, मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी दि. २२ जानेवारीला करण्यात येणार आहे.
पूर्वनियोजनानुसार ही प्रसिद्धी दि. ५ जानेवारीला करण्यात येणार होती. तथापि, या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दि. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत, महसूल उपजिल्हाधिकारी कार्यालयात, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार केंद्रांवर याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. मतदारांनी यादीचे अवलोकन करून आपले नाव असल्याची खातरजमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
———-
जिल्हा लोकशाहीदिन १ जानेवारीला
अकोला, दि. २८ : जिल्हा लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि. १ जानेवारी रोजी दु. ३ वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोडल अधिका-यांनी अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
—————–
पुढच्या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
अकोला, दि. २८ : जिल्ह्यात २०२४ या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून, तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काढला आहे.
त्यानुसार अक्षयतृतीयेनिमित्त दि. १० मे (शुक्रवार) रोजी, रक्षाबंधन- नारळी पौर्णिमेनिमित्त दि. १९ ऑगस्ट (सोमवार) रोजी, ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त दि. ११ सप्टेंबर (बुधवार) रोजी संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच अधिकोष यांना लागू होणार नाही.