राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप
विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोला, दि. २९ : अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाचा शेतकरी समृद्ध होण्यासाठी कसा उपयोग होईल, यादृष्टीने कृषी विद्यापीठाने चारभिंतीच्या पलीकडे जाऊन काम करावे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरावी, असे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करावे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोत्सव- ‘अॅग्रोटेक प्रदर्शन २०२३’ चा समारोप पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खत, औषधे वापरावी लागतात. दुसरीकडे अशा वापराचे दुष्परिणामही मानवी आरोग्यावर होत आहेत. अशा परिस्थितीत विद्यापीठाने शेतक-याचे उत्पन्नही वाढेल व अतिरसायनांचा दुष्परिणामही टळेल, यादृष्टीने संशोधन निर्माण केले पाहिजे. कृषी अर्थशास्त्र लक्षात घेऊन, तसेच वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी उपाय सुचवावेत. कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्रांच्या माध्यमातून तंत्रज्ञान, संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचवावे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील दुग्धोत्पादन कमी आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
कृषी विद्यापीठाच्या मागणीनुसार कृषी पर्यटनासाठी ११ कोटी निधी दोन टप्प्यात जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येईल. त्याचप्रमाणे, स्पर्धा परीक्षा फोरमसाठीही सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन वाण, उत्पादन यांची माहिती जाणून घेतली.
प्रारंभी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविणार
– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोला, दि. २९ : अकोला जिल्ह्यातून बॉक्सिंग प्रकारात चांगले खेळाडू पुढे येत आहेत, याचा आनंद आहे. जिल्ह्याचा क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. बॉक्सिंग क्षेत्रातील खेळाडूंसाठी स्वतंत्र रिंगण विकसित करण्यात येईल, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले.
वसंत देसाई स्टेडियम येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग व शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीसवितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास गतिमान केला. जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंसाठीही अनेक उपक्रम राबविण्यात येतील. मुष्टियुद्ध खेळाडूंसाठी बंदिस्त मैदान विकसित करण्यात येईल. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे उत्तम आयोजन अकोल्यात केल्याबाबत पालकमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत विविध गटांत विजेता ठरलेल्या खेळाडूंना पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक, मानचिन्ह, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.