आमदार नितीन देशमुख यांच्या लढ्याला अखेर यश!
पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखडचा प्रश्न मिटला!
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला – पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखडचा प्रश्न आज शुक्रवारी मार्गी लागला असून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या लढ्याला यश आले आहे. परीसरातील मजूर, वीटभट्टी धारकांच्या रोजगाराचा देखील प्रश्न मिटला आहे. स्थानिक मजूरांना ३ जानेवारी रोजी राख उचलण्याचे लेखी पत्र औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाच्या अभियंत्यांनी दिले आहे.
बाळापूर व परीसरात अनेक वीटभट्टी असून यावर हजारो कामगार व मजूरांचा उदरनिर्वाह चालतो. या विटभट्ट्यांच्या कच्चामालासाठी राखेचा उपयोग होतो. पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख यासाठी उपयोगी पडते. मात्र सात ते आठ महिन्यांपासून राखेचे वितरण थांबले होते. परीसरातील ३०० ते ३५० हेक्टर जमिनीवर पारस येथे औष्णीक विज निर्मीती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. गेली अनेक वर्षापासून प्रकल्पातून निघणारी वेस्टेज राखड ही नाममात्र शुल्कावर स्थानीक वीट उत्पादक यांना उपलब्ध करून दिल्या जात होती. परंतु अलीकडील काळात राखड वितरण संबंधी निविदा मागविण्यात आली. दाखल झालेली निविदा प्रक्रीया ही प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मनमानी व कंत्राटदारास सहाय्यभूत ठरणारी असून ही निविदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेकडून रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले होते.
अखेर स्थानिक मजूर व आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी पाणीमिश्रित सौम्य दर्जाची राख (पॉण्ड अॅश)चा प्रश्न मार्गी लागला. येत्या ३ तारखेला स्थानिक मजुरांना राखड उचल करण्याचे लेखी पत्र पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी दिले. यावेळी
जम्मू सेठ, खलील पंजाबी, महेंद्र लाव्हरे,सुरेश शेलार,
बाळू हिरेकर,दिलीप धनोकार,वसीम पंजाबी,नासिर हुसेन,आनंद बनचरे यांच्या सह बाळापूर येथील प्रतिष्ठित नागरिक वीटभट्टी धारक, ट्रक मजूर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.