जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण
नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन
अकोला, दि. ३१ : जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे व उपचार होत आहेत. नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे दोन पुरूष व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे वय २८ व ४२ वर्षे आहे. जिल्ह्यातील एक ३८ वर्षीय महिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात दुर्गवाडा येथे कोविडबाधित आढळल्याने तिथेच गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
यापूर्वी अकोला महापालिका क्षेत्रात कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या रुग्णास सौम्य लक्षणे होती. त्यामुळे गृह विलगीकरणात उपचार करण्यात आले. हा रुग्ण जेएन-1 पॉझिटिव्ह असल्याची माहिती दि. २४ डिसेंबर रोजी प्राप्त झाली. सद्य:स्थितीत हा रुग्ण बरा असून त्यास कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉ. गाढवे यांनी सांगितले.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये श्वसन आजार व तत्सम लक्षणे आढळल्यास स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवणे, योग्य उपचार देणे आदी कार्यवाही होत आहे. नागरिकांनीही हातांची स्वच्छता, गर्दीत मास्कचा वापर, सर्दी, ताप, खोकला व अंगदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी आदी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीही आरोग्य यंत्रणेची पाहणी करून तपासणी व उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.