अकोला महानगरात शहर वाहतुक नियंत्रण शाखेची मनमानी !
चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार
अकोला – अकोला महानगरात शहर वाहतुक नियंत्रण शाखेची मनमानी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. अकोला महानगरातील शहर वाहतुक नियंत्रण विभागाचे कर्मचारी हे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार करीत आहेत. अकोला महानगरात खेड्यापाड्यातून येणाऱ्या गोरगरीबांना शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे कर्मचारी टारगेट करीत असून अकोला महानगरात खुलेआमपणे ट्रिपल सिट, विना परवाना ऑटो चालक, विना नंबरप्लेट गाड्या, फॅन्सी नंबरप्लेट गाड्या, विना परमीट, विना गणवेश ऑटोचालक हे ऑटो चालवित आहेत. ऑटो मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी भरून येत आहेत. याकडे मात्र, शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे लक्ष दिसून येत नाही. कारण या ऑटो चालकांकडून फ्रंट सिट अवैध वाहतुकीपोटी मोठ्या प्रमाणात चिरीमिरी ही ऑटोचालक देत असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही शहर वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात येत नाही.
दुसरीकडे नविन बस स्टॅन्ड, जुने बस स्टॅन्ड गांधी चौक. टॉवर चौक रेल्वे स्टेशन जैन चौक पोस्ट ऑफिस सिंधी कॅम्प.परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नो पार्किंगमध्ये ऑटो लावण्यात येत असून बस स्टॅन्डच्या दोन्ही एंट्री गेटवर ऑटोचालकांची झुंबड होत असून एसटीला एन्ट्री व एक्जीट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये ऑटोचालकांच्या सवाऱ्या मिळविण्याच्या गडबडीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांची पॉईंट लावलेले असतांना सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहत नसल्यामुळे ऑटोचालकांची मनमानी सुरु असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच महानगरातील वाहतुक सुरळीत राहावी याकरिता ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांची फिक्स पॉईंट लावलेले असतांना सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित न राहता महानगराच्या बाहेर हायवेवर मोठ्या प्रमाणात वसुली करतांना आढळून येत आहे. तसेच नवीन बस स्टॅन्ड जुने बस स्टँड जवळ अवैद्य ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या जात आहेत.याकडे सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळेच कर्मचारी हे मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे.