२०२२-२३ मधील खर्चाला मान्यता;
शहरात सीसीटीव्ही यंत्रणा; ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करणार
मंजूर नियतव्ययानुसार नियोजित विकासकामे वेळेत पूर्ण करा
– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोला, दि. ६ : जिल्हा वार्षिक योजनेत २०२३-२४ वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत प्राप्त निधीशी खर्चाची टक्केवारी केवळ ३४.२९ टक्के आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आदी कार्यवाही तत्काळ पूर्ण करून विकासकामांना चालना द्यावी. विहित मुदतीत ही कामे पूर्ण करावी, असे निर्देश महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजनभवनात झाली. त्याला पालकमंत्री श्री. विखे पाटील हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, नितीन देशमुख, वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., व विविध विभागप्रमुख आदी सभागृहात उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय याही बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या.
बैठकीत सन २०२२-२३ साठी सर्वसाधारण योजनेतील २१४ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतील ८६ कोटी १७ लक्ष रू. व आदिवासी उपयोजनेतील १२ कोटी ४७ लक्ष रू. खर्चास मान्यता देण्यात आली. सन २०२३-२४ साठी सर्वसाधारण योजनेत २५० कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ८८ कोटी व आदिवासी उपयोजनेत १२ कोटी ४९ लक्ष रू. मंजूर नियतव्यय आहे. योजना व उपयोजनांतील प्राप्त निधीशी खर्चाची टक्केवारी केवळ ३२.२१ टक्के आहे. त्यामुळे मान्यतांची कार्यवाही पूर्ण करून तत्काळ कामांना चालना द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
२०२४-२५ च्या प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांकडून सर्वसाधारण योजनेत ७२९ कोटी ४२ लक्ष रू. ची मागणी करण्यात आली आहे. तथापि, गतवर्षीचा आराखडा व कमाल मर्यादा व महत्वाच्या कामांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार तरतूद करण्यात येईल. नाविन्यपूर्ण कामेही राबविण्यात येतील. महत्वाच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण रस्त्यांच्या कामांना चालना द्यावी
ग्रामीण भागासाठी मातोश्री पांदणरस्ते योजना, शेतरस्ते, पांदणरस्ते योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. मातोश्री पांदणरस्ते योजनेत निधी येऊनही कामे पूर्ण झाली नाहीत, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘महाराजस्व’ अभियानात या कामांना गती द्यावी. कुठे कामचुकारपणा होत असेल तर जबाबदार अधिका-यांवर कारवाई करा. मात्र, ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
अकोला शहरासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची निर्मिती
शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता निगराणीसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेसह पोलीसांकडून ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्यासाठी अहमदनगर व इतर ठिकाणी असलेल्या सेंटरचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करावा. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक, पोलीस पथकांना अधिक सक्रिय करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
नरनाळा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वनविभागाच्या परवानगीसाठी स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल. आलेगाव येथील वं. बाळासाहेब ठाकरे शेतकरीभवनाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सभेच्या प्रारंभी स्व. आमदार गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांनी सादरीकरण केले