चालक संघटनांशी चर्चा करूनच केंद्र शासन कायद्याबाबत निर्णय घेणार, वाहनचालकांनी संप मागे घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

चालक संघटनांशी चर्चा करूनच केंद्र शासन कायद्याबाबत निर्णय घेणार, वाहनचालकांनी संप मागे घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. ११ : नवीन ‘हिट अँड रन’ कायदा अद्याप लागू झाला नसून, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांनी आंदोलन व संप त्वरित मागे घ्यावा आणि जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

जिल्ह्यामध्ये पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

प्रशासनाशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सहकार्य करताना वाहने सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नयेत. जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news