स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला, दि. १७ : जिल्ह्यात धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबवावी, तसेच निरंतर व सातत्यपूर्ण स्वच्छतेसाठी सफाई मोहिम ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

शहरी व ग्रामीण भागात, तसेच धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, महिला सशक्तीकरण अभियान आदींबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे, हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्त शहरी, तसेच ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबवावी. परिसरात निर्माण होणारा कच-याच्या विल्हेवाटीसाठी यंत्रणा, ओला, सुका कचरा वर्गीकरण यादृष्टीने आवश्यक तरतुदी व्हाव्यात. निरंतर स्वच्छतेसाठी त्याबाबत प्रभावी जनजागृती व्हावी.सुशोभीकरणाची कामे राबवावीत. मंदिर परिसरातही विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. गावोगाव प्रभातफेरी, रांगोळ्या असे उपक्रम लोकसहभाग मिळवून व्हावेत. रोषणाईसाठी मंदिरांना जिल्हा नियोजन समिती माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विपणनासाठी व ब्रँडिगसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. प्रत्येक रूग्णालयात हिरकणी कक्ष उघडण्यात यावा, असेही निर्देश त्यांनी दिले. महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेचे सादरीकरण आयुक्त श्रीमती द्विवेदी यांनी यावेळी केले. शहरात 12 एकर जागेवरील बायोमायनिंग प्रकल्पाबाबत माहिती त्यांनी दिली.

शासनाच्या नविन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील 36 वाळूघाटांसाठी 11 डेपो निश्चित करण्यात आले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मंजूर झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा डेपोसाठी सागर बजाज यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news