पंजाब राज्याच्या हत्याकांडातील आरोपी जेरबंद !
जीआरपी, रेल्वे पोलिसांनी संशयिताला रेल्वेतून केली अटक!
पंजाब राज्यातील एका हत्याकांडातील आरोपी नांदेडवरून अकोला रेल्वे स्थानकावर येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अकोला रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्रमांक तीन येथे सापळा लावून रेल्वे पोलिस व अकोला लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हत्याकांडातील आरोपी जुगराज सिंग याला शिताफीने अटक केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे पोलिस बल मुस्ताक अहमद व जीआरपी अर्चना गाढवे यांच्या संयुक्त कारवाईत नांदेड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी क्र. १२४८५ हुजूर साहिब नांदेड गंगानगर एक्स्प्रेसमध्ये संशयित व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ट्रेन थांबली असता तिथे आधीच उपस्थित असलेल्या पोलिसांनी ट्रेनमधून संशयिताला शोधण्यात यश मिळविले.
अकोला लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पंजाब राज्यातील हत्या करून पळून गेलेला हा आरोपी संशयित असून, नांदेड पोलिसांच्या माहितीनुसार अकोल्यात अटक
करण्यात आली. जुगराज सिंग (२२) असे या संशयित आरोपीचे नाव असून, मियापूर, जिल्हा तरनतारन पंजाब येथील रहिवासी आहे. अकोला लोहमार्ग पोलिसांना नांदेड पोलिसांनी माहिती दिली. पंजाबमधील एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी गाडी क्र.१२४८५ हुजूर साहिब नांदेड गंगानगर एक्स्प्रेसमध्ये लपवून बसलो असून तो पळून जात आहे. या माहितीवरून अकोला रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांनी गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर येण्यापूर्वीच सापळा लावून स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर थांबताच त्यास अटक केली आहे.