वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण – पवनकुमार कछोट
– सौर उपकेंद्राद्वारे लवकरच १९५ मेगावॉट वीजनिर्मिती; ४३ हजार कृषिपंपधारकांना दिवसा वीज पुरवठा होणार
अकोला : महावितरणच्या वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा केला जात आहे. सौर उपकेंद्राद्वारे लवकरच १९५ मेगावॉट वीज निर्मिती होणार असून त्यानंतर ४३ हजार कृषिपंपधारकांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी आज येथे दिली.
महावितरण व अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने ‘महावितरणची कार्यप्रणाली आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर गुरुवारी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तर व्यासपीठावर कार्यकारी अभियंता जयंत पैकीने, राहुल चौधरी, राजेश काठोळे, पवन लोंढे, श्री.अभोरे, श्रमिकचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिथींचे स्वागत प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, श्रमिकचे उपाध्यक्ष दिलीप ब्राम्हणे, मनोज भिवगडे, अजय डांगे आदींनी केले.
ऊर्जेच्या क्षेत्रात वीज निर्मितीपासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास, वीज पुरवठ्यातील तांत्रिक मुद्द्यांवर पवनकुमार कछोट यांनी सविस्तर प्रकाश टाकला. महावितरणच्या अकोला मंडळांतर्गत तीन विभाग असून ११५८ मनुष्यबळ कार्यरत आहे. जिल्ह्यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी, उच्चदाब व इतर असे एकूण चार लाख ५० हजार ५६५ ग्राहकांची संख्या आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात १३३० सौर पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. ६९ हजार ८२० कृषिपंपधारक ग्राहक असून ४२ टक्के त्यांचा वीज वापर आहे. संपूर्ण वीज यंत्रणेवर अतिरिक्त भार होऊ नये म्हणून कृषिपंपांना दिवसा व रात्री प्रत्येकी आठ तास चक्राकार पद्धतीने दोन गटात विभागून वीज पुरवठा केला जातो, अशी माहिती पवनकुमार कछोट यांनी दिली.
कृषी वाहिन्या सौर ऊर्जेद्वारे जोडल्या जाणार आहेत. जिल्ह्यात ५३ उपकेंद्रांची निवड केली. ४३ उपकेंद्रासाठी ५२३.५६ हेक्टर प्राप्त झाली असून १९५ मेगावॉट ऊर्जानिर्मितीसाठी निविदा काढल्या आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ४३ हजार ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ऊर्जा हा सर्व नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पत्रकारांनी तांत्रिक माहिती जाणून घेण्यासाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन पवार यांनी व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये वीज देयक, सुरक्षा, मोबाइल ॲप आदींची माहिती विविध सत्रात देण्यात आली. सूत्रसंचालन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी, तर आभार श्रमिकचे सचिव विशाल बोरे यांनी मानले.
अकोल्यात तीन महिन्यात ‘प्री-पेड’ मीटर
अकोला शहरात लवकरच वीज ग्राहकांकडे ‘प्री-पेड’ मीटर लागणार आहे. त्यांचे कंत्राट देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात शहरातील उपविभाग दोनमधील २६ हजार ग्राहकांकडे प्री-पेड मीटर लागेल, अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
एसटी व महापालिकेचे ‘चार्जिंग स्टेशन’
शहरात एसटी महामंडळ व महापालिकेचे ‘चार्जिंग स्टेशन’ लवकरच कार्यरत होणार आहे. त्याला महावितरणने मंजुरी दिली. केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून स्मार्ट मीटर, कृषी व गावठाण वाहिनी विलगीकरण, वितरण हानी कमी करणे व यंत्रणेच्या सक्षमीकरणाची कामे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.