भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
संविधानातील मूल्यांची जोपासना करून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती
– जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 26 : भारतात सात दशकांहून अधिक काळ लोकशाही दृढपणे टिकून व वृद्धिंगत होत आहे. हा विकसनशील देश महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे. संविधानातील न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता या मूल्यांची जोपासना करत शासन-प्रशासनाकडून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती देण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी यावेळी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले.
देशासाठी योगदान देणारे हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक, महापुरूषांना जिल्हाधिका-यांनी अभिवादन केले व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, महसूल सप्ताहानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची, तसेच शेती क्षेत्रासाठी राबविलेल्या अतिवृष्टी सहाय्य, पीक विमा आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली.ते म्हणाले की, यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीसारखी संकटे उद्भवली असताना जिल्ह्यात पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात आली व जिल्ह्यातील 2 लक्ष 591 अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना 164 कोटी 14 लक्ष रू. निधीची मदत मंजूर करण्यात आली. ‘मनरेगा’मध्ये जिल्ह्यात 8 लक्ष 65 हजार 603 एवढी मनुष्य दिवस निर्मिती होऊन 93.69 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. लम्पी आजाराने पशुधनाच्या नुकसानासाठी एक हजार 921 पशुपालकांना सुमारे 55 लाख रू. अर्थसाह्य देण्यात आले. यंदा 2 लाख 34 हजार 228 पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
नियोजन
जिल्हा वार्षिक योजनेनुसार नियोजनाची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की, तांडा विकास योजनेच्या २३ कामांसाठी १ कोटी ८९ लक्ष, तर महावितरणच्या २५२ कामांना २१ कोटी ५९ लक्ष रू. निधीला मान्यता देण्यात आली आहे. श्री राजराजेश्वर मंदिरास क वर्ग पर्यटन दर्जा देऊन २५ लक्ष रू. निधी मंजूर आहे. नगरोत्थान व दलितेतर योजनेत जिल्ह्यासाठी ४९ कोटी ६१ लक्ष रू., औषधे खरेदीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३ कोटी ५० लक्ष व ग्रामीण रूग्णालयांना २ कोटी ९९ लक्ष रू. निधी मंजूर आहे. महाआरोग्य मेळाव्यासाठी २२.८७ लक्ष रू. वितरित करण्यात आले असून, मेळाव्याचा २२ हजार गरजूंना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांसाठी ९ कोटी ६६ लक्ष रू. आणि कोल्हापुरी बंधा-यांसाठी ८ कोटी २२ लक्ष रू, मंजूर असून, अकोला शहरासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ निर्माण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिन सोहळा; विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन
अकोला, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात विविध सुरक्षा दले, शाळा, महाविद्यालये, संस्थांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख अशा विविध महापुरूषांच्या वेशभूषेत त्यांचा संदेश प्रसारित करत महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेचे दर्शन घडवले.
जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, गृहरक्षक दल, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, स्काऊट- गाईड यांनी शिस्तबद्ध कवायतीचे सादरीकरण केले, पोलीस वाद्यवृंद पथक, श्वानपथक, नॅशनल मिलिट्री स्कूल, बिनतारी संदेश विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग आदींनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास घडणा-या दुष्परिणामांची जाणीव करून देणारा रस्ता सुरक्षा अभियानाच्या सादरीकरणातील ‘यमराज’ही लक्षवेधी ठरला. गुरूनानक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कवायती सादर केल्या. महिला व बालविकास विभागातर्फे सादरीकरणात भारतमातेचे दर्शन घडवून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या विविध अधिकारी, कर्मचारी, संस्था- संघटनांचे प्रतिनिधींचा गौरव यावेळी करण्यात आला.
विकसित भारत संकल्प यात्रा
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, आवास योजना, उज्ज्वला योजना, विश्वकर्मा, किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, जनधन योजना, अटल पेन्शन योजना अशा 27 योजनांची माहिती व लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आला. ही यात्रा 504 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचून 2 लाख 65 हजार 638 व्यक्तींनी सहभाग घेतला.
यात्रेत आवास योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी वेगाने प्रक्रिया राबविण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेत 6 हजार 160 घरे, रमाई आवास योजनेत 2 हजार 571 घरे आणि शबरी आवास योजनेत 751 घरे मंजूर करण्यात आली आहेत. संकल्प यात्रेत आरोग्य शिबिरांचा लाभ 24 हजार 233 व्यक्तींनी घेतला, तर सुमारे एक लाख 51 हजार व्यक्तींना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत 2 हजार 91, सुरक्षा विमा योजनेत 21 हजार 123 व जीवन ज्योती विमा योजनेत 6 हजार 929, पीएम किसान योजनेत 4 हजार 319 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली.
मतदारदिन उपक्रमांचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपल्या मताधिकाराच्या योग्य वापरामुळेच ख-या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करावी व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.